रघुनाथ येमूल यांच्या दरबारात संजय दत्तचीही हजेरी | पुढारी

रघुनाथ येमूल यांच्या दरबारात संजय दत्तचीही हजेरी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आध्यामिक गुरु आणि ज्योतिषाचार्य रघुनाथ येमूल गुरूजी यांच्या दरबारात अनेक राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, अभिनेते नियमित हजेरी लावत असत. त्यांचा भक्तगणही मोठा आहे.

मागील वर्षी अभिनेते संजय दत्त यांनी देखील गुरूजींचे गुणगाण गायिले आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट दोघांच्या छायाचित्रासह प्रसिद्ध केले आहे.

ऐरवी इतरांचा हात पाहून भविष्य वर्तविणार्‍या गुरूजींचा हात पाहून पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात चतु:श्रृंगी पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर पुणे शहर व परिसरात एकच खळबड उडाली आहे.

अधिक वाचा : 

औंधमधील एका प्रतिष्ठित कुटुंबातील सुनेचे पायगुण चांगले नाहीत, तिच्यामुळे तू आमदार, मंत्री होऊ शकणार नाही, असा सल्ला या रघुनाथ येमूल गुरुजींनी दिला. त्यामुळे त्यांच्यावर सुनेच्या छळाला कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे.

ध्यानगुरु रघुश्री

रघुनाथ येमूल हे सिद्धी कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते स्वत:ला ‘ध्यानगुरु रघुश्री’ असे म्हणवून घेतात. याच नावाने ते दररोज सोशल मिडियावर दिवसाचे महत्व व शुभ मुहूर्त सांगत असतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतिषाचार्य म्हणून येमूल यांची ओळख आहे. तासन् तास ते हात पाहत असल्याचे समजते. आपला हात दाखविण्यासाठी त्यांची आगाऊ वेळ घ्यावी लागते. वैयक्तिक भेट घेऊन हात दाखविण्याचे ते ११ हजार रुपये घेत असल्याचे सांगितले जाते.

 

कॉपोरेट क्षेत्रातही यांचा दबदबा

हस्तरेषा पाहून ते भविष्य सांगतात. कॉपोरेट क्षेत्रातही त्यांचा मोठा दबदबा आहे. अनेक जण त्यांच्याकडून मुहूर्त काढून त्यानंतरच पुढे पाऊल टाकतात. अनेक राजकीय नेते कोणतेही नवीन पाऊल टाकण्यापूर्वी त्यांचा सल्ला घेतात. प्रशासकीय अधिकारीही आपले भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या दरबारात जात असतात.

औंधमधील उद्योजक कुटुंबही त्यांचे भक्त बनले होते. तुझी पत्नी पांढऱ्या पायगुणाची आहे. तिचे ग्रहमान दुषित झाले आहेत. जर तुझी ही बायको म्हणून अशीच कायम राहिली तर तू आमदार ही होणार नाही आणि मंत्री ही होणार नाही.

अधिक वाचा : 

मी देतो हे लिंबु उतरविल्यानंतर तुझ्या मागची ही पिडा कायमची निघून जाईल, असे त्यांना सांगितले होते. त्यांच्या भविष्यवाणीमुळेच उद्योजक पती व त्याच्या कुटूंबियांनी पीडित महिलेचा छळ केला. तिला सिगारेटचे चटके दिले. मारहाणीत तिला बहिरेपणा आला. त्यांचा छळ करुन त्यांना घराबाहेर काढले होते.

अशा गुन्ह्यात कठोर कारवाई करणार, पोलिस आयुक्त

ज्योतिषांच्या सांगण्यावरुन विवाहितांचा छळ केल्याप्रकरणी तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी रघुनाथ येमूल या ज्योतिषाला अटक केली आहे.

रघुनाथ येमूल प्रमाणे कोणीही व्यक्ती, महिला या अपशकुनी आहेत. त्यांच्यामुळे ग्रहमान दुषित झाले आहे,’ वगैरे सांगून महिलांना त्रास देत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

या गोष्टींवरुन सासरचे लोक त्रास देत असतील तसेच कोणी अंधश्रद्धा पसरवत असेल तर त्याबाबत नागरिकांनी संबंधित पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

हेही वाचले का?

पाहा : दिलीप कुमार आणि पुण्याचे ऋणानुबंध  सांगणारा व्हिडिओ 

Back to top button