पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुफळीनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वांधिक पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. बहुतांश पक्ष कार्यकारी अजित पवारांसोबत गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाने नव्याने पिंपरी-चिंचवड कार्यकारिणी समिती स्थापन केली आहे. या समितीवर पक्षाने 9 सदस्यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पिंपरी-चिंचवड शहरासाठी कार्यकारिणी समिती गठित गेल्याची घोषणा सोमवारी (दि.17) केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या मान्यतेने ही शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
या कार्यकारिणी समितीवर सदस्य म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक शहराध्यक्ष इम—ान शेख, कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्यासह काशिनाथ जगताप, प्रशांत सपकाळ, देवेंद्र तायडे, मयूर जाधव, राजन नायर, शिला भोंडवे या 9 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, पक्षातील या दुफळीनंतर शरद पवार यांचा गट सक्रीय झाला. त्यांनी राज्यभरातील अनेक ठिकाणी जिल्हाध्यक्षांवर कारवाई करून पदाधिकारी तत्काळ बदलले. परंतु, पिंपरी-चिंचवडबाबत कोणताही निर्णय अद्याप झाला नव्हता. शहरातील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह बहुसंख्य आजी-माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते, तसेच, ज्येष्ठ नेत्यांच्या मुलांनी अजित पवारांना साथ दिली आहे. त्यामुळे अखेर शरद पवार यांच्या गटातून कार्यकारिणी समिती नियुक्ती करून शहरात पक्षाचे काम सुरू राहावे, यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे दिसते आहे.
शहर पातळीवर लवकरच भूमिका मांडणार
पक्षाने आमच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. शरद पवार यांच्या विचार प्रवाहात अधिकाधिक लोकांना सामावून घेण्याचा प्रयत्न आम्ही करू. शहर पातळीवर लवकरच याबाबत सविस्तर भूमिका मांडण्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी सांगितले.