अलताफ कडकाले :
नगर : खेळाडू म्हणून ओळख मिळणे, तशी सोपी गोष्ट नाही. कित्येक वर्षे स्वतःला झोकून देऊन एखाद्या खेळात प्रभुत्व प्राप्त करणे, त्याहीनंतर त्याच तोडीच्या स्पर्धकांबरोबर स्पर्धा करून पदके मिळवणे, यासाठी किती संयम, धैर्य आणि मेहनत लागत असेल, याचा अंदाज कोणीही करू शकत नाही. परंतु, त्यांची ही मेहनत तेव्हा सफल होते, जेव्हा यश मिळते, परंतु या खेळाडूंना पुढे जाण्यासाठी त्यांच्या पाठीवर थाप पडते तेव्हा त्यांच्या या संयम, धैर्य अन् मेहनतीचे चीज होते. नगरमधील अशाच दोन खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. या खेळाडूंचा इथपर्यंत प्रवास इतका सोपा तर नव्हताच; तर अनेक अडचणींचा सामना करून त्यांनी हे यशोशिखर गाठले आहे.
सायकलपटू प्रणिता सोमण हिची सप्टेंबरमध्ये होणार्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. तिने आयर्पंत दक्षिण आशियाई स्पर्धेत ब्राँझ पदक, तर राष्ट्रीय स्पर्धेेत 21 सुवर्ण, सात रौप्य, सहा ब्राँझ पदके पटकावली आहेत. मूळची संमगनेरची असणारी प्रणिताला आठ, नववीत असतानाच खेळाची आवड निर्माण झाली. यावेळी सायकलिंगसह नेटबॉल व बुद्धबळ खेळत होती. पुढे दहावीनंतर वडील डॉ. प्रफुल्ल सोमण यांनी तिला कोणत्याही एकाच खेळावर लक्ष केंद्रित करण्याचे सांगितले. म्हणून तिने धाडसी असणार्या सायकलिंग या खेळाची निवड केली.
यामध्येही 'एमटीबी' म्हणजेच डोंगरदर्यात सायकलिंग करणे या प्रकारात सराव करण्यास सुरू केले. नंतर खेळातील आपली आवड टिकून ठेवण्यासाठी तिने नगरमधील पेमराज सारडा महाविद्यालयात प्रवेश घेतला. नगरमध्ये असताना भारतीय सैन्य दलाच्या सायकलिंग संघासोबत सराव सुरू ठेवला. याचदरम्यान तिची 2016मध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. तिने या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले. यानंतर तिचे मनोबल वाढतच गेले. पुढेनंतर 'एमटीबी' प्रकारात करिअर करण्याचे ठरविले. याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी पुण्यात ही काही काळ तिला राहावे लागले. नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी तिने सारडा कॉलजची निवड केली. याच दरम्यान महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप जाधव आणि सचिव संजय साठे यांनी तिला पुढील स्पर्धासाठी मार्गदर्शन केले. यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवत गेली. दोन अशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. नॅशनल गेममध्येही ब्राँझपदक पटकावले आहे. तिला 2020, 21 आणि 22 या तीन वर्षांचा भारतीय सायकलिंग फेडरेशनचा 'उत्कृष्ट खेळाडू'चा पुरस्कार मिळाला आहे.
आई-वडिलांची स्वप्नपूर्ती करणार!
प्रणिता सांगते की, आई स्वाती व वडील प्रफुल्ल सोमण यांची मोलाची साथ मिळाल्याने लहानपणापासून धाडसी खेळ प्रकारात काहीतरी करून दाखविण्याची जिद्द असल्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाला सुवर्ण पदक मिळवून देण्याचा मानस आहे. त्यासाठीच आजवरचा खेळातील हा माझा प्रवास असल्याचे आवर्जून सांगितले. यासाठी सध्या मी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मितेल ठक्कर यांच्याकडे सराव करत आहे. हा सराव ऑनलाईन असून, दररोज ऑनलाईन क्लासनंतर मैदानावर सराव करते.
हे ही वाचा :