बनावट धनादेश पुण्यात वटविण्याचा प्रयत्न - पुढारी

बनावट धनादेश पुण्यात वटविण्याचा प्रयत्न

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशातील (यूपी) मनरेगा खात्याचा 92 कोटी 99 लाख रुपयांचा बनावट धनादेश पुण्यातील एचडीएफसी बँकेत वटविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी उत्कर्ष कन्स्ट्रोवेल कंपनी (वाल्हेकर कॉम्प्लेक्स, नर्‍हे), प्रताप अण्णाराव पाटील (वय 36, रा. अस्पायर टॉवर, हडपसर), दत्तात्रय कारमपुरी (रा. सोलापूर) व इतरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

उत्कर्ष कन्स्ट्रोवेल ही मेट्रो तसेच रस्तेबांधणीचे काम करते. तिचे एचडीएफसी बँकेत खाते आहे. कंपनीच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लखनौ येथील जवाहर भवन शाखेचा मनरेगा खात्याचा धनादेश बनावट सह्या करून त्यावर 92 कोटी 99 लाख रुपयांची रक्कम लिहिली. हा धनादेश कंपनीने बँकेत भरला. एचडीएफसी बँकेच्या अधिकार्‍यांना या धनादेशाविषयी संशय आला. त्यांनी या धनादेशाची स्कॅन कॉपी त्यांच्या लखनौ शाखेकडे पाठविली. तेथील एचडीएफसी बँकेतील अधिकाऱ्यांनी स्टेट बँकेत जाऊन या धनादेशाविषयी चौकशी केल्यावर तो बनावट असल्याचे व या खात्यातील सर्व व्यवहार हे ऑनलाइन होत असल्याचे समोर आले.

रेकी करून सराफांना लुटणार्‍या दोघांना बेड्या

असा धनादेश दिला गेला नसल्याचे लखनाै याथील शाखेतून सांगण्यात आल्यानंतर बँकेने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी उत्कर्ष कन्स्ट्रोवेल कंपनीकडे चौकशी केल्यावर त्यांना हा धनादेश प्रताप पाटील व दत्तात्रय कारमपुरी यांनी दिल्याचे समोर आले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सलगर तपास करीत आहेत.

भेसळयुक्त खव्याचे राज्यात ठिकठिकाणी अड्डे

‘‘93 कोटींचा धनादेश वटविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे.’’
– देविदास घेवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सिंहगड रोड पोलिस

Back to top button