...म्हणून बिबट्याने अन्नाविना घालवला पाण्यावरच दिवस - पुढारी

...म्हणून बिबट्याने अन्नाविना घालवला पाण्यावरच दिवस

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हडपसर साडेसतरानळी परिसरात मंगळवारी रात्री उशीरा बिबट्याला पाच ते सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रेस्क्यू करण्यात वनविभाग आणि इतर संस्थांना यश आले. भुलीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला ताब्यात घेतले, खरे पण सेंटरवर पोहोचण्यापूर्वीच बिबट्याला जाग आली. सर्व काळजी घेऊन त्याची रवानगी पिंजर्‍यात करण्यात आली. या सगळ्या प्रकारात भांबावलेल्या बिबट्याने सेंटरवर पोहोचल्यानंतर बुधवारचा संपूर्ण दिवस केवळ पाण्यावरच घालवला असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.

याबाबत दै. ‘पुढारी’शी बोलताना बावधनच्या रेस्क्यू सेंटरचे डॉ. चेतन दिलीप वंजारी म्हणाले की, ’बिबट्याला कोणतीही दुखापत न होता ताब्यात घेण्याचा आमचा वेगळा प्रयत्न होता. जो आमच्या सर्व टीमने यशस्वीपणे पूर्ण केला. बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन त्याच्यावर ताबा मिळविण्यासाठी रात्री 11 च्या सुमारास पहिला डॉट मारण्यात आला. त्यानंतर त्याला रेस्क्यू करणारी टीम जवळ जाताच तो पुन्हा गुरगुरला. बिबट्यावर पहिल्या डार्टचा फारसा प्रभाव पडला नसल्याचे दिसून आल्यानंतर पंधरा मिनिटांनी पुन्हा दुसरा डार्ट मारला. त्यामध्ये बिबट्या बेशुद्ध झाला. साधारणतः 3 ते 4 वर्षांचा असलेल्या बिबट्यावर रेस्क्यू टीमने त्वरित ताबा मिळवित वन विभागाने लावलेल्या पिंजर्‍यात टाकण्यात आले.’

किरण गोसावी नाव बदलून विविध राज्यांत राहायचा : पुणे पोलीस आयुक्त

बिबट्याला दिलेल्या भुलीच्या इंजेक्शनचा प्रभाव साधारणतः एक ते दीड तास राहतो. त्याप्रमाणे बाधवन येथील रेस्क्यू सेंटरजवळ येताच बिबट्या शुद्धीवर आला; परंतु काही प्रमाणात त्या भुलीचा असर असल्याने सेंटरमधील पिंजर्‍यामध्ये बिबट्याची अलगद रवानगी करण्यात आल्याचे डॉ. वंजारी यांनी सांगितले.

किरण गोसावी अखेर पुणे पोलिसांच्या ताब्यात; गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाची पुण्यात कारवाई

बिबट्याची पिंजर्‍यामध्ये रवानगी केल्यानंतर त्या ठिकाणी पाणी आणि त्याचे अन्न ठेवण्यात आले होते. भुलीच्या प्रभावाखालून बिबट्या बाहेर येताच त्याने केवळ पाणी प्राशन केले. त्याने अन्नाकडे बघितलेही नाही. बुधवारी दिवसभरात बिबट्याने केवळ पाणी प्राशन केले असून अन्न घेतले नाही. वन विभागाच्या नियमानुसार 48 तास बिबट्यावर नजर ठेवून वैद्यकीय सल्ल्यानुसार त्याला त्याच्या मूळ अधिवासात सोडण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. एकदा भक्ष्य पकडले तर बिबट्या आठवडाभर काही खात नाही. त्यामुळे अशा प्राण्यांचे खाण्याचे नक्की नसते. त्यामध्ये पिंजर्‍यात असेल तर बिबट्या अन्न खातच नाही, असेही डॉ. चेतन वंजारी यांनी यावेळी सांगितले.

Back to top button