पुणे; पुढारी वृत्तसेवा : पूर्वी कलाकारांचा प्रवास हा रंगभूमीवरून पडद्यावर होत असे. सध्या या क्षेत्रात येणारे कलाकार आपल्याला टीव्हीवर जायचे, असे काहीतरी ठरवूनच या क्षेत्रात येतात. त्यामुळे आता पडद्यावरून रंगभूमीवर, असा प्रवास सध्याचे तरुण कलाकार करताना दिसतात. आपण मराठी नाटकात काम करतो, हे सांगणे अभिमानास्पद वाटावे, यासाठी मराठी नाटकांची पतप्रतिष्ठा वाढविणे हे नाट्यपरिषदेचा अध्यक्ष म्हणून आपल्यासमोरचे मोठे आव्हान आहे, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दामले यांचा नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी पत्रकार भवन येथे झालेल्या कार्यक्रमात दामले यांचा पुणेरी पगडी देऊन सत्कार केला. नाट्यपरिषदेसाठी कोथरूड शाखेने दिलेल्या 12 हजार 500 रुपये देणगीचा धनादेश त्यांना सुपूर्त केला. या वेळी नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, सहकार्यवाह समीर हंपी आणि सत्यजित धांडेकर, कोशाध्यक्ष दीपक गुप्ते आदी उपस्थित होते.
राज्यात असलेल्या नाट्यगृहांपैकी 48 ठिकाणी नाटकांचे प्रयोग करता येतात. नाट्यगृहांमधील कमतरतांबाबत 28 थिएटर्सचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या नाट्यगृहांची देखभाल हे काम फारच जिकिरीचे असून, ही सर्व नाट्यगृहे दुरुस्ती देखभालीसाठी एका छताखाली असणे आवश्यक आहे. शासनाच्या अधिकार्यांनीही ते आता मान्य केले आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होईल, असे दामले यांनी सांगितले.
हेही वाचा