हिंजवडी : आयटी परिसरात शनिवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे परिसरातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. तसेच, यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.
पाण्यातून मार्ग काढताना चालकांची कसरत
अनेक ठिकाणी रस्त्यावर पुलाखाली पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याचे चित्र होते. वाकड, पुनवळे, ताथवडे म्हाळुंगे येथील सखल रस्त्यावर आणि द्रुतगती महामार्गाच्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले होते. परिणामी या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. नागरिकांना यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत होती.
शेती कामांची लगबग
परिसरात सकाळपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा होता. मात्र, त्यानंतर पावसाची सुरुवात झाली. शेतकर्यांनी भात रोपे टाकली असून, खरीप हंगामाची तयारी सध्या सुरू आहे. त्यामुळे शेत जमीन कसून तयार करण्यात आली आहे. पावसाने हजेरी लावल्यामुळे शेती कामांची लगबग सुरू असताना, परिसरात वीज मात्र गुल होती.
वाहनांच्या लांबच्या लांब रांगा
हलक्या आणि मध्यम पावसाच्या सरी पडत होत्या. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला होता. पावसामुळे दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. आयटीनगरी हिंजवडीतदेखील पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. लक्ष्मी चौक, शिवाजी चौक, फेज 2 या रस्त्यावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
हेही वाचा