खोर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मान्सूनजवळ आला असतानाही खोर (ता. दौंड) परिसरात उन्हाच्या झळा काही केल्या कमी होताना दिसत नाही. परिणामी, गावातील पाणीसाठ्यांनी तळ गाठला असून, तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकण्याची वेळ आली असून, शेतीपिके जळू लागली आहेत. त्यामुळे डोंबेवाडी व फरतडे वस्ती तलावात पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
डोंबेवाडी परिसरात अंजिराच्या फळबागा मोठ्या प्रमाणावर आहेत. इतर पालेभाज्या, उन्हाळी पिके, कडधान्ये पिके तसेच जनावरांचा चारा मोठ्या प्रमाणात घेतला गेला आहे. मात्र, कडक उन्हामुळे येथील विहिरी, दोन्ही तलाव, बोअरवेल, नाले, ओढे कोरडेठाक पडले आहेत. गावात तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाण्याअभावी नागरिकांचे मोठे हाल सुरू आहेत. जनावरांसाठीदेखील पिण्याचे पाणी मिळनासे झाले आहे.
पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून डोंबेवाडी तलावात व जनाई उपसा योजनेतून फडतरे वस्ती तलावात पाणी सोडण्यात येते. मात्र, हे आवर्तन अजूनपर्यंत सोडण्यात आलेले नाही. मागील काही दिवसांपूर्वी जनाई उपसा योजनेतून पाणी सोडण्यात आले होते. मात्र, याचा काहीच फायदा शेतकरीवर्गाला झाला नाही. शेतकरीवर्गाने पाणीपट्टी भरूनदेखील समाधानकारक पाणी शेतीला मिळाले नाही.
दरम्यान, अंजिराचा खट्टा बहार धरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यासाठी कडक उन्हाळ्यात तावदानावर सोडण्यात आलेल्या अंजीर बागेला वेळेत पाणी मिळणे गरजेचे आहे. आताच जर वेळेत पाणी मिळाले तर पुढील ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार्या अंजीर बागा चांगल्याप्रकारे फळ धरणा करू शकतात. त्यामुळे या भागातील शेतकरीवर्गाने उशाशी असलेल्या सिंचन योजनेतून एक आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे.
पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून खोरच्या डोंबेवाडी तलावापर्यंत बंदिस्त पाइप लाइन योजनेचे पाणी आणण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यानुसार तलाव सर्वेक्षणदेखील करण्यात आले. आमदार राहुल कुल यांनी सिंचन विभागच्या अधिकारी वर्गाला तलाव फेरसर्वेक्षण करण्याच्या सूचनादेखील दिल्या. मात्र, अजूनपर्यंत या बाबत कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या पाणी योजनेची प्रक्रिया लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी या भागातील शेतकरीवर्ग करीत आहे.
हेही वाचा