मुंबई-हैद्राबाद हायस्पीड बुलेट ट्रेन ३ तासांत कापणार अंतर - पुढारी

मुंबई-हैद्राबाद हायस्पीड बुलेट ट्रेन ३ तासांत कापणार अंतर

बारामती, पुढारी वृत्तसेवा : बारामतीसह पुणे जिल्ह्यातून जाणारी मुंबई-हैद्राबाद ही बुलेट ट्रेन ६५० किमीचे अंतर अवघ्या तीन तासांत कापणार आहे. शुक्रवारी (दि. २२) बारामतीत नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशनकडून या प्रकल्पाच्या प्रारुप आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यात प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी जनसुनावणीही पार पडली.

बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यासह नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशन लि.चे अनिल शर्मा, सत्यव्रत पांडे, शाम चौगुले यांनी प्रारुप आराखडा सादर करण्यात आला. डाॅ. अपर्णा कांबळे व प्राजक्ता कुलकर्णी यांनी या मार्गाविषयी सविस्तर माहिती दिली. देशात सध्या प्रस्तावित तीन मार्गांवर या विभागाकडून काम सुरु आहे. त्यात मुंबई-अहमदाबाद मार्गाचे काम सुरु झाले आहे. मुंबई-हैद्राबाद व मुंबई-नागपूर या मार्गावरही काम सुरु केले जाणार आहे.

मुंबई-हैद्राबाद हा मार्ग राज्यातील ठाणे, रायगड, पुणे व सोलापूर या चार जिल्ह्यांतून जाणार आहे. ग्रीन कॅरिडाॅर (बागायती क्षेत्र) मधून हा मार्ग जात आहे. पूल व बोगद्यातून ही बुलेट ट्रेन जाईल. रस्त्यावरून ती धावणार नाही.  जिल्ह्यात लोणवळ्याला ८४.५५ किमी अंतरावर पहिला, पुण्यात १४६ किमी अंतरावर दुसरा तर बारामतीत २१९ किमी अंतरावर तिसरा थांबा असेल. जिल्ह्यात २०४ किमी लांबीचे अंतर ही ट्रेन धावेल. बारामतीत गाडीखेल (कटफळ) जवळ तिचे स्टेशन असेल.

पाचपट भरपाई मिळणार

या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत केल्या जातील त्यांना शहरी भागात बाजारमूल्याच्या २.५ पट तर ग्रामीण भागात ५ पट मोबदला मिळणार आहे. जमिनीचे बाजारमूल्य मागील तीन वर्षांत झालेल्या खरेदीखतांवेळी भरलेल्या शासकिय मुद्रांक शुल्कानुसार निश्चित केले जाणार आहे.

जिल्ह्यातील मावळमधील ८५.३८ हेक्टर, खेडमधील २२.४ हेक्टर, हवेलीमधील १.२६ हेक्टर, पुरंदरमधील ३५.६९७ हेक्टर, दौंडमधील ८.०५ हेक्टर, बारामतीतील ७४.७२३ हेक्टर तर इंदापूर तालुक्यातील ५३.२ हेक्टर अशी ३६०.४८ हेक्टर जमिनीची प्रकल्पासाठी आवश्यकता आहे. मावळमधील २९, खेडमधील ८, हवेलीतील १९, पुरंदरमधील ६, दौंडमधील २ व बारामती व इंदापूरातील प्रत्येकी १३ गावांचा त्यात समावेश आहे. जिल्ह्यातील ३६०.४८ हेक्टर जमीन त्यासाठी आवश्यक असून त्यात २७६.६९ हेक्टर खासगी तर ८३.७९ हेक्टर सरकारी जमिनीचा समावेश आहे. २१८८ भूखंड त्यामुळे बाधित होतील.

बुलेट ट्रेनला बागायती क्षेत्रातून विरोध

प्रस्तावित मुंबई- हैद्राबाद या बुलेट ट्रेनला बागायती क्षेत्रातून नेण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. शासनाने बागायती क्षेत्रातून हा प्रकल्प नेत शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवू नये, अन्यथा प्रकल्पाविरोधात आत्मदहन करू असा इशारा बारामतीत झालेल्या जनसुनावणीवेळी देण्यात आल्या. बागायती क्षेत्राऐवजी सध्या अस्तित्वात असलेल्या मुंबई-हैद्राबाद या रेल्वे अथवा महामार्गाजवळून ही ट्रेन न्यावी अशी मागणी करण्यात आली.

जिल्ह्यातील बारामती, इंदापूर तालुक्यातून या प्रस्तावित मार्गाला अधिक विरोध आहे. या भागातून अगोदर निरा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प गेला आहे. त्यात सध्या पालखी महामार्गासाठी जमिन संपादीत झाली आहे. आता पुन्हा बुलेट ट्रेनसाठी बागायती जमिनी गेल्यास शेतकरी देशोधडीला लागेल अशी भिती शुक्रवारी बारामतीत आयोजित जनसुनावणीवेळी व्यक्त करण्यात आली.

पहा व्हिडीओ : कोल्हापुरातील गूढ गयाक्षेत्र

Back to top button