पुणे, पुढारी वृत्तसेवा: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 12 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा राज्यातील 8 हजार 823 शाळांतील 1 लाख 1 हजार 846 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी एकूण 3 लाख 64 हजार 413 अर्ज दाखल झाले. प्रवेशासाठीच्या सोडतीतून 94 हजार 700 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. 13 एप्रिलपासून प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठीची मुदत 22 मे रोजी संपली. दिलेल्या मुदतीत 64 हजार 256 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर 37 हजार 590 जागा अद्यापही रिक्त आहेत. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतची सूचना कधी येणार याकडे पालकांचे लक्ष लागले होते. मात्र, सात दिवस त्याबाबत काहीच सूचना देण्यात आली नाही. अखेरीस मंगळवारी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतची सूचना प्राथमिक शिक्षण विभागाने आरटीईच्या संकेतस्थळावर दिली. त्यानुसार प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी 30 मे ते 12 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
प्रतीक्षा यादीत पहिल्या टप्प्यात 25 हजार 890 विद्यार्थ्यांना संधी देण्यात आलेली आहे. त्यापैकी पहिल्याच दिवशी 325 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. येत्या 12 जूनपर्यंत प्रवेशाची मुदत असल्यामुळे आणि प्रतिक्षा यादीत भरपूर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आल्यामुळे यंदा आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांचा टक्का वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.