पुणे टिंबर मार्केट आग : चाळीस तास उलटले; अजूनही धग कायम
पुणे; पुढारी वृत्तसेवा : भवानी पेठेतील टिंबर मार्केटमध्ये गोदामाला गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. दरम्यान, आग लागून तब्बल चाळीस तासांचा कालावधी उलटल्यानंतरही कुलिंग करण्याचे काम सुरूच आहे. अग्निशमन दलाचे सहा बंब शुक्रवारी दिवसभर हे काम करीत होते. आग लागलेल्या सर्व गोदामांत लाकडे होती.
त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर देखील आतमध्ये आग धुमसत होती. गुरुवारी दिवसभर पाण्याचा मारा करून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत जवानांनी दोन सत्रांत काम करून कुलिंगचे काम हाती घेतले. जेसीबीच्या साह्याने जळालेली लाकडे बाजूला काढून ती शांत करण्यात येत होती. गोडाऊन पर्त्यांच्या शेडचे असल्यामुळे ऑपरेशन करताना जवानांना देखील मर्यादा येत होत्या. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर त्यांना हेच काम करावे लागले.
पोलिसांनी गुरुवारी व शुक्रवारी असे दोन दिवस जळालेल्या गोदामांचे पंचनामे केले. आगीचे कारण शोधण्यासाठी याबाबतची पत्रे पोलिसांनी विद्युत वितरण व अग्निशमन विभागाला दिली आहेत. तसेच, पोलिसांच्या फॉरेन्सिक पथकाने आगीच्या ठिकाणचे नमुने घेतले आहेत. याबाबतच सर्व अहवाल खडक पोलिसांनी पोलिस उपायुक्त, अपर पोलिस आयुक्त यांच्याकडे दिला आहे. काही गोदामांत कुलिंगचे काम सुरू असल्यामुळे तेथील पंचनामे होऊ शकलेले नाहीत. दरम्यान, याबाबत अग्निशमन विभागाकडे आगीच्या
कारणाबाबत विचारले असता, त्यांनी अद्याप आग नेमकी कोणत्या कारणातून लागली, हे स्पष्ट झाले नसल्याचे सांगितले.