पुणे : आरोग्यवर्धिनीसाठी जागा शोधल्या; पण केेंद्रे कागदावरच! | पुढारी

पुणे : आरोग्यवर्धिनीसाठी जागा शोधल्या; पण केेंद्रे कागदावरच!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गेल्या वर्षी 29 आणि नवीन आर्थिक वर्षात 96 आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू करण्याचा घाट घालण्यात आला. पहिल्या टप्प्यातील 9 केंद्रे सुरू करण्यासाठी महापालिकेने जानेवारी महिन्यात जिल्हा परिषदेला पत्र दिले होते. अद्याप केंद्रांच्या डागडुजी, दुरुस्तीचे कामही झालेले नाही. त्यामुळे आरोग्यवर्धिनी केंद्रे केवळ कागदावरच असल्याचे निदर्शनास येत आहे.

समाविष्ट गावांमधील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देता यावी, यासाठी गेल्या वर्षी आरोग्यवर्धिनी केंद्रांची संकल्पना पुढे आली. तत्कालीन आरोग्य सचिव डॉ. तुकाराम मुंढे यांनी स्वत: लक्ष घालून केंद्रांचे काम वेगाने करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सिंहगड रस्ता (2), कोंढवे धावडे, शिवणे, हडपसर, कोथरुड, कोंढवा, बावधन आणि धनकवडी येथील जागा केंद्रांसाठी शोधण्यात आल्या.

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत केंद्रांच्या जागा महापालिका, तर मनुष्यबळ, औषधे, फर्निचर आदी सुविधा जिल्हा परिषदेमार्फत पुरवणार असल्याचे ठरवण्यात आले. मात्र, महापालिका आणि जिल्हा परिषदेमधील संवादाचा अभाव, आरोग्यप्रमुखांनी स्वत:च्या अखत्यारीत ठेवलेले अधिकार, सहायक आरोग्य अधिका-यांना चर्चेत समाविष्ट करून न घेणे अशा अंतर्गत वादामुळे आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या कामाला फटका बसला.

आरोग्यवर्धिनी केंद्रे 31 मार्चपर्यंत सुरू करण्याची मुदत होती. आता, 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिकेतर्फे अजूनही संबंधित जागांची डागडुजी, देखभाल-दुरुस्ती केली जात आहे. प्रत्येक केंद्रांच्या डागडुजीसाठी 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबद्दल विचारणा केली असता, एकमेकांच्या कोर्टात चेंडू टोलवण्याचे काम सुरू आहे.

पुढचे पाठ, मागचे सपाट…

मागील वर्षातील आरोग्यवर्धिनी केंद्रांचा पत्ता नसताना आता आरोग्य विभागातर्फे नवीन आर्थिक वर्षात आणखी 96 केंद्रांची घोषणा करण्यात आली आहे. समाविष्ट गावांमधील लोकसंख्येला आरोग्य सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने आरोग्यवर्धिनी केंद्रे उपयुक्त ठरतील, असा दावा महापालिकेकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, घोषणा हवेतच विरणार असल्याचे चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे.

आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या डागडुजीचे काम सुरू आहे. येत्या 15 जूनपर्यंत जास्तीत जास्त केंद्रे सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे.

                                                             – विकास ढाकणे,
                                                अतिरिक्त आयुक्त, महापालिका

महापालिका हद्दीतील आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या जागा ताब्यात घेऊन डागडुजीचे काम पूर्ण झाल्यावर महापालिकेने जिल्हा परिषदेला पत्र पाठवायचे आहे. जिल्हा परिषदेकडून साधनसामग्री, मनुष्यबळ सज्ज आहे. पत्र प्राप्त झाल्यावर लगेचच पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल.
                                                    – डॉ. रामचंद्र हंकारे,
                                                    जिल्हा आरोग्य अधिकारी

Back to top button