शैक्षणिक संस्थांमध्ये शहरी नक्षलवाद पसरतोय ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | पुढारी

शैक्षणिक संस्थांमध्ये शहरी नक्षलवाद पसरतोय ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ज्याला आपण शहरी नक्षलवाद म्हणतो, ती एक विचारधारा आहे. ते देशातील संविधान मानत नाहीत. देशातील व्यवस्था त्यांना मान्य नसते. अशी विचारधारा युवा तरुणांच्या डोक्यात व्हायरस पसरविण्याचे काम करीत असून, महाविद्यालये आणि विद्यापीठ कॅम्पसमध्ये यांची घुसखोरी वाढत आहे. त्यामुळे याविरोधात लढाई लढावी लागणार असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आयोजित राष्ट्रीय कार्यकारिणी परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, ज्येष्ठ उद्योगपती बाबा कल्याणी, अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजशरण शाही आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, नक्षलवादी लोक भारताची व्यवस्था, संस्कृती, विचारधारा कशी चुकीचे आहे, हे पसरविण्याचे काम करतात. परंतु, त्यांच्याविरोधात आपल्याला लढावे लागेल. माओवादी लोकांविरोधात अभाविप लढले.

त्या वेळी अभाविपच्या अनेक कार्यकर्त्यांना आपले प्राण गमवावे लागले. पण, आज माओवादी लोकांची संख्या कमी झाली आहे. त्यांना आता माणसे मिळत नाहीत. परंतु, आपल्याला नक्षलवाद, माओवादाविरोधात लढणारी राष्ट्रवादी पिढी तयार करावी लागणार आहे. राष्ट्र, चरित्र निर्माण करण्याचे काम अभाविप करीत आहे. भारत बलशाली बनतो आहे. मजबूत देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. येणारी पिढी ही देश, समाजाचा विचार करणारी असल्याशिवाय देश पुढे जाणार नाही.

माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे म्हणाले की, हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेत मोठी प्रगती होत आहे. आज जगात आपण चौथ्या क्रमांकावर आहोत. येत्या काळात आपण तिसर्‍या स्थानावर असू. ज्येष्ठ उद्योजक बाबा कल्याणी म्हणाले की, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशाची प्रगती होत आहे. त्यातूनच आज तंत्रज्ञानात देश आघाडीवर आहे. आपल्याला युवा पिढीवर विश्वास असून, तरुणांच्या हातात देशाचे भविष्य सुरक्षित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अभाविपमुळेच माझ्यातील नेतृत्वगुणांचा विकास…

अभाविप अशी संघटना आहे, जी विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा देते. अभाविपमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. माझ्यातील नेतृत्वगुणांचा विकास हा अभाविपमुळेच झाला. काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा फडकविण्याचे धाडस तत्कालीन काळात भारतीय नेते करीत नव्हते. त्या वेळी अभाविपने लाल चौकात तिरंगा फडकविण्याचे ध्येय ठेवले आणि ते पूर्ण देखील केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Back to top button