दिनेश गुप्ता
पुणे : पाकिस्तानच्या हनिट्रॅप जाळ्यात अडकलेला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा (डीआरडीओ) शास्त्रज्ञ प्रदीप मोरेश्वर कुरुलकर याच्या हेरगिरी प्रकरणाची दिवसेंदिवस व्याप्ती वाढत आहे. कुरुलकर याने पुण्यातील विश्रामगृहाबरोबर मुंबईच्या सांताक्रुझ येथील विश्रामगृहावर देखील काही महिलांसोबत लीला रंगविल्याचे एटीएसच्या (दहशतवाद विऱोधी पथक) तपासात निष्पन्न झाले आहे.
पाकिस्तानी ललनाच्या हनिट्रॅपमध्ये अडकलेल्या कुरुलकरचे नवनवे किस्से समोर येत आहेत. दिघी येथील डीआरडीओच्या विश्रामगृहात महिलांना भेटणार्या कुरुलकरने त्याचा आणखी एक अड्डा मुंबईतील सांताक्रुझ डीआरडीओ कार्यालयातील विश्रामगृहावर बनविला होता. एटीएस तपास यंत्रणेने याचा पूर्णपणे उलगडा केला असून, त्या विश्रामगृहावर तो कोणाकोणाला भेटला? त्याला कोणकोणत्या महिला भेटल्या? याचा संपूर्ण लेखाजोखा तयार केला आहे.
कुरुलकर रात्रीच्या वेळी मुंबईच्या गेस्ट हाऊसमध्ये भेटलेल्या महिलांची संख्या एक-दोन नाही तर त्याहून अधिक होती. त्याला भेटणार्या महिला त्याच्या परिचयाच्या आहेत. ज्या कालावधीत कुरुलकर 'झारा' या पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात होता, त्याच कालावधीत
या गेस्ट हाऊसमध्ये अनेक महिलांशी भेटी झालेल्या आहेत. त्यामुळे त्याचा काही परस्परसंबंध आहे का? याचा तपास लावण्यात एटीएसला यश आल्याचे सूत्रांनी सांगितले.
झाडाझडतीत जप्त केलेला मोबाईल बंद असल्याचे सांगत माहिती लपविण्याचा प्रयत्न कुरुलकरने केला. एटीएसने पॉलिग्राफ चाचणीची गरज व्यक्त करताच कुरुलकरने स्वतः तो मोबाईल सुरू करून दिला. फोन सुरू होताच अधिकार्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्या मोबाईलमध्ये भारताच्या अनेक क्षेपणास्त्रांचे डिझाइन्स असल्याचे एटीएसला आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले.