शरद पवार म्हणाले, हीच आघाडी पुन्हा सत्तेत येईल | पुढारी

शरद पवार म्हणाले, हीच आघाडी पुन्हा सत्तेत येईल

पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : ईडी, सीबीआय, अमली पदार्थविरोधी विभाग आदी यंत्रणांचा गैरवापर आणि छापेमारीचे कितीही उद्योग करा, महाविकास आघाडी यत्किंचितही हलणार नाही. उलट जनतेचा विश्वास संपादन करून पुन्हा एकदा सत्तेत येईल, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शनिवारी) केला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्यावर केलेले आरोप योग्य नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलताना पवार यांनी राज्यातील विरोधी पक्ष व केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, दोन-तीन वर्षांपूर्वी ईडी नावाचा प्रकार माहीत नव्हता. आता त्या यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. भावना गवळी यांच्यासारख्या महिला खासदाराकडे आरोपाचे फासे घेऊन जातात. राष्ट्रवादीचे प्रवक्तेे असलेल्या नवाब मलिक यांच्या जावयाला अमली पदार्थ प्रकरणी अटक केली जाते. पुढे तपासात तो गांजा नव्हता तर एक वनस्पती होती, असे पुढे येते.कोणाच्याही खिशात काही टाकायचे, सहा महिने तुरुंगात घालवायचे, सत्तेचा गैरवापर करायचा, असा सारा प्रकार चालला आहे. गुन्हेगार व्यक्तींना पंच म्हणून घेऊन चांगल्यांना अडकवण्याचा उद्योग चालला आहे, अशी टीकाही शरद पवार यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तीन भगिनींच्या घरी पाच दिवस छापे मारणे योग्य नव्हे. शिवाय छापे मारणारे काही बोलत नाहीत, माजी मुख्यमंत्री व एका पक्षाचे माजी खासदार खुलासा करतात हा विचित्र प्रकार आहे. ही कारवाई आकसाने केली जात आहे. मी पुन्हा येणारच सांगणारे सत्ता नसल्याने अस्वस्थ आहेत. त्यामुळे राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.

एकनाथ खडसे हे विधानसभेत प्रभावी नेते होते. मात्र त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्याविरोधात खटले दाखल झाले. मुख्यमंत्री व माजी खासदाराने काही गोष्ट काढली की, यंत्रणा अ‍ॅक्शन घ्यायला सुरुवात होते. हा चुकीचा पायंडा पडला आहे. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला.

उद्धव ठाकरे हे ‘मातोश्री’वरून कारभार हाकतात या आरोपांबाबत बोलताना पवार म्हणाले की, प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी असते. महाराष्ट्रात काही वेगळे घडले की, मी त्या त्या ठिकाणी जायचो. मात्र संकटकाळात निर्णय घेणारा एका जागी राहून योग्यरीत्या नियोजन करतो, याचे उदाहरण उद्धव ठाकरे आहेत. अतिवृष्टी, कोकणातील नुकसान, कोरोना संकट या काळात त्याचे प्रत्यंतर आले आहे, असे पवार म्हणाले. एका जागी बसून योग्य नियोजन व व्यवस्था करणे यात गैर काही नाही, असे पवार यांनी सांगितले.

लखीमपूर येथे मंत्र्याच्या मुलाने शेतकर्‍यांना चिरडून मारल्याच्या घटनेबाबत पवार म्हणाले की, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि ती घडल्यावर मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. मात्र सत्तेचा दर्प मोठा आहे. शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पवार यांनी केला. राज्य सरकार भ्रष्ट असून तशा चीप त्यांच्याकडे आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्यावर पवार यांनी अशा चीप फडणवीस यांनी दाखवाव्यात, कशी वसुली करतात तेही दाखवावे, असा टोला पवार यांनी लगावला. फडणवीस यांना सत्ता गेल्याचे दुःख आहे. अजूनही ते आपण मुख्यमंत्री आहोत असे समजतात. पुन्हा येणार असे म्हणतात. सत्ता मिळाल्याशिवाय त्यांना चैन पडणार नाही, असा चिमटाही पवार यांनी काढला.

ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते

उद्धव ठाकरे यांना काहीही करून मुख्यमंत्री व्हायचे होते, या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिप्पणीवर बोलताना पवार म्हणाले की, सरकार बनवण्यात माझाही सहभाग होता. आमदारांची बैठक झाली त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला तयार नव्हते. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेचे महाराष्ट्रासाठी असलेले योगदान लक्षात घेऊन तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझे मित्र असल्याने मी उद्धव ठाकरे यांना तयार केले. मित्राच्या चिरंजीवाला मुख्यमंत्री व्हायला भाग पाडले हे फडणवीसांनी लक्षात घ्यावे.

महापालिकेबाबतचा आदेश त्यांच्या कानात सांगेन…

राज्यातील महापालिकांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार का, असे विचारले असता शरद पवार म्हणाले की, ते मी सांगू शकणार नाही. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या-त्या जिल्ह्यात एकत्र बसून निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे. मात्र या विषयावर आपले मत काय, असे विचारले असता माझं मत हा आदेश होईल, मी तुम्हाला नाही, त्यांच्या कानात सांगेन, असे पवार म्हणाले.

पोलीस आयुक्त गेले कुठे?

राज्यात सीबीआयला एखादी कारवाई करायची असेल तर राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. मात्र एका राज्यात काही घडले की धागेदोरे महाराष्ट्रात दाखवून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिस आयुक्तांनी गृहमंत्र्यांवर आरोप केले. आम्ही गृहमंत्री देशमुख यांना राजीनामा द्यायला सांगितले. मात्र आज तक्रार करणारा कुठे गायब आहे याचा पत्ता नाही. आयुक्त गेले कुठे, याचा शोध केंद्र सरकारने घ्यावा, असे पवार म्हणाले.

Back to top button