पुणे : पर्यायी मार्ग रद्दसाठी बेमुदत शेतकऱ्याचे धरणे आंदोलन | पुढारी

पुणे : पर्यायी मार्ग रद्दसाठी बेमुदत शेतकऱ्याचे धरणे आंदोलन

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा: जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी महामार्ग क्रमांक ९६५ जी हा इंदापूर – बारामती राज्य महामार्गावरील निमगाव केतकी येथील शेतकऱ्यांच्या शेतातून जात असून हा परस्पर रिअलायमेंट (पर्यायी मार्ग) रद्द करण्यासाठी बाधित शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. १५) विजयादशमीच्या दिवसापासून निमगावात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

केलेल्या मागण्यानुसार प्राधिकरणाने चालू रस्ता शंभर फूट असताना देखील ७० फूट दाखवून दिशाभूल केली आहे. चालू रस्त्याच्या दक्षिण बाजूने असणार्‍या जुन्या रस्त्यांचा विचार केलेला नाही. बाह्यावळण करू नये असा १५ ऑगस्ट २०१७ चा ग्रामसभेचा ठराव प्राधिकरणास सादर केलेला आहे. गुगल अर्थ नकाशानुसार रस्ता ३६०० मीटर लांबीचा दाखविला आहे. व रिअलायमेंट रस्ता १५६० मीटर लांबीचा दाखवून दिशाभूल केलेले आहे.

चालू रस्त्याचे अंदाजपत्रक ६४ कोटी ४ लाख रुपये व रिअलायमेंट रस्त्याचे ३९ कोटी ८२ लाख दाखवून दिशाभूल केली आहे. प्राधिकरणाने २८ मार्च २०१८ रोजीच्या प्रत्यक्ष वस्तुस्थितीच्या अहवालामध्ये चालू रस्ता २० ते २५ मीटर रुंद दाखवून चुकीचा अहवाल पाठवलेला आहे. मोजणीच्या नोटिसा काढून दडपशाही केली जात आहे.

यासाठी सक्षम प्राधिकारी तथा प्रांताधिकारी आणि ८ मार्च २०१८ रोजी बाधित होणारे शेतकरी, अल्पभूधारक व मध्यम भूधारक आहेत. चालू रस्त्यावर अंडरपास करावा असा स्वय स्पष्ट अहवाल दिलेला आहे. प्राधिकरणाने अधिनियमातील तरतुदीचा भंग करून २७ मार्च २०१८ ची अधिसूचना कार्यवाही विना रद्द करून २७ जानेवारी २०२१ ची अधिसूचना जारी करून दडपशाही चालवलेली आहे.

तरी सक्षम प्राधिकारी यांनी १७ ऑगस्ट २०२१ च्या निकाल पत्रामध्ये सुनावणी दरम्यान मांडलेल्या मुद्द्यांचा खुलासा केलेला नाही. तसेच सदर निकाल पत्रामध्ये प्राधिकरणाने केलेला खुलासा तांत्रिकदृष्ट्या चुकीचा आहे हे निकालपत्र आम्हा शेतकऱ्यांना मान्य नाही. अशा पद्धतीचा मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत.

पर्यायी मार्ग रद्द करण्याच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हे बेमुदत धरणे आंदोलन स्थगित करण्यात येणार नाही असेही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सांगितले.

यावेळी सर्जेराव जाधव, संदीप भोंग, तात्यासाहेब वडापुरे, बाबासाहेब भोंग, ॲड. सचिन राऊत, सचिन चिखले, मच्छिंद्र आदलिंग, भारत बरळ, अमोल राऊत, म्हसुदेव वडापुरे, नवनाथ आदलिंग यांच्यासह आदी शेतकरी मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button