पुणे; पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविल्यानंतर जिल्ह्यातील जत्रा-यात्रांचा हंगाम जोमात सुरू आहे. प्रत्येक गावाच्या जत्रा-यात्रेत आता बैलगाडा शर्यत भरवली जात असून, एका गावात एका देवाऐवजी आता तीन-चार देवांची यात्रा भरवली जात आहे. या प्रत्येक देवाच्या यात्रेसाठी स्वतंत्र बैलगाडा शर्यत भरवली जाते. एवढेच नाही, तर आमदार-खासदारांसह गावागावांतील नेत्यांच्या वाढदिवसाला देखील भव्यदिव्य बैलगाडा शर्यती भरविण्याचे पेव फुटले आहे. यामुळे मात्र या बैलगाडा शर्यतींना परवानगी देणे व कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महसूल, पोलिस यंत्रणा अडकून पडत आहे.
बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर व कोरोना निर्बंधांविना प्रथमच जत्रा-यात्रांचा हंगाम सुरू आहे. जिल्ह्यात जत्रा-यात्रांचा हंगाम सुरू असल्याने दररोज दोन-तीन अर्ज महसूल प्रशासनाकडे बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळण्यासाठी दाखल होतात. बैलगाडा शर्यतीशिवाय सध्या एकाही गावची जत्रा पार पडत नसल्याचे चित्र आहे.
पूर्वी गावात एखाद्याच देवाची यात्रा मोठ्या प्रमाणात पार पडायची. पण, सध्या बैलगाडा शर्यतीसाठी एका गावात दोन, तीन, चार देवांच्या यात्रा भरविल्या जात आहेत. याशिवाय गावातील, तालुक्यातील विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, सरपंच यांच्या वाढदिवसानिमित्त हिंद केसरी बैलगाडा शर्यत, महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत आयोजित केल्या जात आहेत. यामुळे महसूल प्रशासनाचा कामाचा ताण देखील वाढला आहे. पोलिसांना देखील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक बैलगाडा शर्यतीला बंदोबस्त द्यावा लागत आहे.
सध्या तालुक्यात दररोज एक-दोन ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात आहे. प्रत्येक गावात किमान एकतरी बैलगाडा मालक आहेच, असे वातावरण आहे. गावातील एका बैलगाडामालकासह गावातील बहुतेक सर्व तरुण पिढी बैलगाडा शर्यतीसाठी जाते. मोफत प्रवास व वडापावसाठी सध्या बहुतेक सर्व तरुण पिढीला बैलगाडा शर्यतीचे व्यसन लागले असून, हातातील कामधंदा सोडून ही तरुण पिढी दिवस दिवस बैलगाडा शर्यतीसोबत घालवत आहे.
खेड तालुक्यात जानेवारी 2023 पासूनची आकडेवारी घेतली असता 4 महिन्यांत तब्बल 92 बैलगाडा शर्यतींना परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात 9, फेब्रुवारी 13, मार्च 45 आणि एप्रिल 25 अशी आकडेवारी आहे.
संतोष चव्हाण, नायब तहसीलदार, खेड