आर्यन खान ड्रग्ज प्रकरण: साक्षीदार किरण गोसावी विरोधात पुणे पोलिसांची लूकआऊट नोटीस | पुढारी

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण: साक्षीदार किरण गोसावी विरोधात पुणे पोलिसांची लूकआऊट नोटीस

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे पोलिसांकडे दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी किरण गोसावी याच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस काढण्यात आली आहे. क्रूझ पार्टीतील आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात गोसावी साक्षीदार आहे. 2018 मध्ये पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात गोसावी याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, त्यामध्ये त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आर्यन खान याला पकडून एनसीबी कार्यालयात नेताना गोसावी दिसून आला होता. राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी केलेल्या आरोपानंतर गोसावीचे नाव चर्चेत आले होते.

याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गोसावीविरुद्ध 2018 मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पुण्यातील एका तरुणाने फिर्याद दिली आहे. किरण गोसावी याने आपल्या फेसबुकवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती. त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून 3 लाख रुपये घेऊन किरण गोसावी याने मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने ते भारतात परत आले. त्यानंतर त्यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली होती. मात्र, या प्रकरणात तो अजूनही फरार आहे. त्यामुळे आता फरासखाना पोलिसांनी या गुन्ह्यात त्याचा शोध सुरू केला असून, त्याच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस काढली आहे.

दिल्ली पोलिसही गोसावीच्या मागावर

किरण गोसावी याने माझ्यासह पालघर, मुंबई, आंध्र प्रदेश येथील अनेकांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली आहे. दिल्लीतील तरुणांनादेखील त्याने फसवले आहे. दिल्ली पोलिसही त्याचा शोध घेत असल्याचे चिन्मय देशमुख याने सांगितले.

चिन्मय देशमुख म्हणाले, त्याने आम्हाला मलेशियामध्ये नोकरी देतो, म्हणून टुरिस्ट व्हिसावर पाठविले. माझ्यासह आणखी 5 ते 7 तरुण होते. नंतर वर्क व्हिसा देतो, असे सांगितले होते. मात्र, त्याने कोणालाही नोकरी दिली नाही. किरण गोसावी याच्याकडून फसवणूक झालेले हे तरुण माझ्या संपर्कात आहेत. दिल्लीमध्येही त्याने काही जणांची फसवणूक केली असल्याने दिल्ली पोलिसही त्याच्या शोधात आहेत. मुंबईमध्ये आंध्र प्रदेशातील काही तरुणांनी फसवणूक झालेबाबत गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही, असेही तो म्हणाला

Back to top button