पुणे-नगर महामार्गावरील पावसाळी नाल्यांचे काम अर्धवट

पुणे-नगर महामार्गावरील पावसाळी नाल्यांचे काम अर्धवट
Published on
Updated on

दीपक नाईक

वाघोली : पुणे-नगर महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुतर्फा केसनंद फाटा ते जगताप वस्तीपर्यंत पावसाळी नाल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, या नाल्यांचे काम अर्धवट असून, त्या माती, दगड व कचर्‍याने भरल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे पावसाळी नाल्यांवर खर्च केलेल्या लाखो रुपयांच्या निधीचा अपव्यय होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

वाघोली येथे नगर महामार्गावर पावसाचे पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने दर वर्षी पुराची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा नाल्या निर्माण करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. याबाबत दैनिक 'पुढारी'ने वारंवार वृत्त प्रसिद्ध करून या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे मागील दोन वर्षांपूर्वी महामार्गालगत दुतर्फा पावसाळी नाल्या बांधण्यात आल्या.

बांधकाम विभागाने कुठलाही अभ्यास न करता केवळ नागरिकांची ओरड बंद होण्यासाठी नाल्यांचे काम केले आहे. खरेतर खांदवेनगरपासून विठ्ठलवाडीपर्यंत पावसाळी नाल्यांचे काम होणे गरजेचे होते. तसेच, केलेल्या नाल्याही अर्धवट असल्याने त्यामधून पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्ग नसल्याने पुराची समस्या कमी झाली नाही. यामुळे अर्धवट असलेल्या नाल्यांचे काम पूर्ण करून त्यांची साफसफाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

पावसाळ्यात पुराचा धोका

पावसाळ्यात महामार्गाला पुराचे स्वरूप आल्याने अनेकांच्या दुचाकी पाण्यात वाहून गेल्या आहेत. तसेच, काहींना जीवही गमवावा लागला आहे. नाल्यांचे काम अर्धवट केल्याने नागरिकांच्या पदरी निराशा पडली आहे. महामार्गावर केसनंद फाटा ते जगताप वस्तीपर्यंत लाखो रुपये खर्च करून पावसाळी नाल्या बांधल्यात आल्या आहेत. परंतु, अर्धवट नाल्यांमुळे शासनाने लाखो रुपयांची उधळपट्टी करूनही पुराची समस्या सुटली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नगर महामार्गावरील पावसाळी नाल्यांची लवकरच साफसफाई केली जाईल. याबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत.

          -मिलिंद बारभाई, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news