पुणे; पुढारी वृत्तसेवा : महात्मा फुले मंडईसह शहरातील 32 मंडईमधील गाळ्यांच्या भाडेवाढीसंदर्भात महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा गाळेधारक व्यावसायिकांची बैठक घेऊन योग्य तो तोडगा काढावा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. दरम्यान, गाळ्याच्या भाडेवाढीविरोधात शहरातील सर्व राजकीय पक्ष एकवटले आहेत. हा विषय मुख्य सभेत मान्य करण्यापूर्वी चर्चेसाठी वेळ देण्याची मागणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे.
महात्मा फुले मंडईमध्ये 1 हजार 600 गाळे आहेत. तर इतर 31 मंडईमध्ये 1 हजार 400 गाळे आहेत. महापालिकेने 2004 मध्ये शेवटची भाडेवाढ करून तेथे प्रतिमहा 32 रुपये भाडे निश्चित केले. त्यानंतर भाडेवाढ केली नसल्याने महापालिकेचा देखभाल दुरुस्तीचा खर्चही निघत नव्हता. त्यामुळे मालमत्ता व्यवस्थापन विभागाने सर्व मंडईचे मूल्यांकन करून घेऊन त्यांचे भाडे निश्चित केले आहे. त्यानुसार हा प्रस्ताव तयार करून स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवला होता. त्यास सोमवारी मान्यता देण्यात आली.
त्यानंतर गाळेधारक व्यावसायिकांनी आपली नाराजी सर्वपक्षीय नेत्यांसह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कानावर घातली. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी सोमवारी बैठक घेतली. या वेळी महापालिका प्रशासनाने आपली बाजू मांडली. गाळेधारकांच्या मागणीनुसार कोविड काळातील भाडे माफ करण्यात आले आहे. तीस वर्षांपासून करार झाले नाहीत, ते करण्यास व्यावसायिकांनी मंजुरी दिली आहे. शिवाय त्यांना भाजीसह इतर वस्तूंची विक्री करण्यासही मंजुरी देण्यात आल्याचे अधिकार्यांनी सांगितले. यावर गाळेधारकांनी भाडेवाढ अवास्तव असल्याचे सांगितले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी पुन्हा एकदा व्यावसायिकांची बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या.
महापालिकेच्या या निर्णयाविरोधात शहरातील सर्व राजकीय पक्ष एकवटले आहेत. विषयपत्र चुकीच्या पद्धतीने ठेवले आहे. भाडेवाढ कायद्याच्या कसोटीवर अमान्य असल्याचा दावा करत मुख्य सभेत हा विषय मान्य करण्याआधी चर्चेसाठी वेळ देण्याची मागणी सर्व पक्षांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. या वेळी माजी आमदार उल्हास पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, प्रशांत बढे, उज्ज्वल केसकर, दीपक मानकर, बाबा मिसाळ, प्रसन्न जगताप आदी उपस्थित होते.