Pune Crime : एकतर्फी प्रेमातून कोयत्याने वार करून शाळकरी मुलीचा खून | पुढारी

Pune Crime : एकतर्फी प्रेमातून कोयत्याने वार करून शाळकरी मुलीचा खून

पुणेः पुढारी वृत्तसेवा

ऐन नवरात्रात पुणेकरांच्या अंगावर शहारे आणणारी घटना मंगळवारी सायंकाळी पावने सहाच्या सुमारास बिबवेवाडीतील यश लॉन्स परिसरात घडली. अवघ्या चौदा वर्षाच्या आठवीत शिकरणार्‍या कबड्डीपटू मुलीवर २१ वर्षाच्या तरुणाने मित्रांना सोबत घेऊन धारदार कोयत्याने वार केले. या हल्ल्यात ती जागेवरच गतप्राण झाली.

क्षितिजा अनंत व्यवहारे (वय 14, रा. अप्पर बिबवेवाडी) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. कबड्डीचा सराव झाल्यानंतर स्ट्रेचिंग करत असताना तरुणाने तिच्यावर साथीदारांना सोबत घेत हल्ला केला. एकतर्फी प्रेमातून मुलीचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

यातील मुख्य संशयित ऋषिकेश भागवत याच्यासह अन्य तिघांना बारा तासांच्या पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत बिबवेवाडी पोलिस ठाण्यात ऋषिकेश उर्फ शुभम बाजीराव भागवत (वय 21, रा. सुखसागर नगर, मुळ. खंडाळा, जि. सातारा) याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेली मुलगी कबड्डीपटू असून आठवीत शिक्षण घेत होती. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ती तिच्या मैत्रिणींसोबत बिबवेवाडी येथील यश लॉन्स परिसरात कबड्डीचा सराव करण्यासाठी आली होती. कबड्डी खेळून झाल्यानंतर ती मैत्रिणीसोबत स्ट्रेचिंग करत थांबली होती. त्यावेळी दुचाकीवर तिघेजण त्या ठिकाणी आले.

तिघांपैकी नात्यातील असलेला आरोपी भागवत याने तिला बाजूला ओढले. त्यावेळी एकतर्फी प्रेमातून त्यांच्यात वादावादी सुरू केली. त्याच रागातून शुभम याने सोबत आणलेल्या कोयत्याने मुलीवर सपासप वार केले. त्याच्यासोबत असलेल्या दुसर्‍या मित्राने देखील तिच्यावर वार केले. मानेवर आरोपींनी वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीचा जागीच मृत्यू झाला.

यावेळी आरोपींनी तिच्या सोबत असलेल्या मुलींना धमकाविले. त्यानंतर घटनास्थळी कोयते टाकून आरोपींनी पळ काढला. आरोपींनी मुलीला धमकाविण्यासाठी आणलेले खेळण्यातील पिस्तूलही सापडले आहे.

खुनाच्या घटनेमुळे परिसरात व्यायाम करण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते. तेथील काही प्रत्यक्षदर्शींनी ही घटना पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षावला कळविली होती.

त्यानंतर परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे, गुन्हे शाखेचे अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा माग काढण्यास सुरूवात केली. काही संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

दीड वर्षापासून शुभम देत होता क्षितीजाला त्रास

शुभम हा मुळचा सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील आहे. त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. आई व तो एवढाच परिवार आहे. तो पुण्यातील त्याच्या मावशीकडे वास्तव्यास आला होता. सुरुवातीला तो सुखसागरनगर येथे राहत होता. त्याची मावशी मृत क्षितीजाची नातेवाईक आहे. दीड वर्षापुर्वी शुभम याला क्षितीजाच्या घरच्यांनी समज दिली होती. त्यानंतर तो चिंचवड येथे राहण्यास गेला होता. मात्र तरी देखील तो तिच्या मागावर होता. अखेर मंगळवारी माथेफिरू शुभम याने तिच्यावर कोयत्याने अमानुषपने वार केले. आणि क्षितिजा जागेवरच गतप्राण झाली.

शाळकरी मुलीचा खून : मैत्रिणींनी केला वाचविण्याचा प्रयत्न पण…

खून झालेली मुलगी यश लॉन्स येथील परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत तिच्या मैत्रिणीसोबत स्ट्रेचिंग करत होती. आरोपी शुभम भागवत हा त्याच्या दोन साथीदारासोबत दुचाकीवरून आला होता. त्याने मुलीला बाजूला खेचले. काही समजण्याच्या आतच त्याने कोयत्याने तिच्या मानेवर सपासप वार केले. त्याच्या एका साथीदाराने देखील मुलीवर वार केले. हा सर्व प्रकार सुरु असताना, तिच्या मैत्रिणीपैकी एका मुलीने आरोपीच्या हातातील चाकू खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र शुभम बेभान झाला होता. त्याने मुलीवर सपासप वार केले. घाव वर्मी लागल्याने मुलगी जागेवरच गतप्राण झाली. तिच्या मैत्रिणींनी आरडा-ओरडा करत बाजूला पळ काढला. पण आरोपींनी तत्काळ दुचाकीवरून पळ काढला. हा सर्व प्रकार काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिला. तर शेजारील रहिवाशांनी घरे बंद करून घेतली. यावेळी कोणीही मदतीसाठी धजावले नाही.

शाळकरी मुलीचा खून :  पंधरा मिनिटापुर्वीच तेथे पोलिस येऊन गेले होते

या परिसरात नेहमी पोलिसांकडून गस्त घातली जाते. सोनसाखळी चोरट्यांमुळे पोलिस सतत या भागात सद्या पोलिस गस्त घालत आहेत. अवघ्या पंधरा मिनिटापुर्वीच राऊंडवरील पोलिस येऊन गेले होते. मात्र त्यानंतर ही भयंकर घटना घडली.

शाळकरी मुलीचा खून : नातेवाईक सुन्न,आईने फोडला हंबरडा

घटनेची माहिती मिळताच मुलीच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या चिमुकल्या मुलीची अशी अवस्था पाहून आईने मोठ्याने हंबरडा फोडला. तर इतरांना काही सुचेनासे झाले. कोणीही काहीही बोलण्यास तयार नव्हते. रात्री उशिरापर्यंत मुलीचा मृतदेह त्याच जागेवर होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. आरोपींनी वार केलेली हत्यारे ताब्यात घेत इतर पुरावे गोळा केले. रात्री उशिरापर्यंत फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळी उभी होती.

लोकांनी काढला पळ

सायंकाळी सहाची वेळ असल्याने त्या ठिकाणी जेष्ठ नागरिकांसह इतर नागरिक चालण्यासाठी आले होते. मात्र आरोपींचे क्रौर्य पाहून व रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या क्षितीजाचा मृतदेह पाहून आलेल्या नागरिकांनी तेथून अक्षरशः पळ काढला. कोणालाही क्षितीजाची मदत करण्याचे धाडस झाले नाही. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की हा गोंधळ बघून आम्ही तिथे गेलो गेलो. तर एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडलेली होती. व्यायामासाठी आले ज्येष्ठ नागरिक व नेहमीचे लोक हे बघून पळून गेले.

क्षितीजाच्या घरची परिस्थिती साधारण

क्षितीजाच्या घरची परिस्थिती साधारण असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिचे वडील शाळेची व्हॅनवर चालकाचे काम करतात.

 

मृत झालेली अल्पवयीन मुलगी व आरोपी मुलगा हे नातेवाईक असल्याचे आमच्या तपासात समोर आले आहे. एकतर्फी प्रेमातून हे कृत्य झाल्याचा संशय आहे. आरोपींच्या शोधासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत.
नम्रता पाटील, पोलीस उपायुक्त, झोन ५

 

Back to top button