पुणे : वेताळ टेकडी भूत नव्हे-देवदूत ! नियोजित रस्त्यासह बोगदे रद्द करा; पर्यावरणप्रेमींची मागणी

पुणे : वेताळ टेकडी भूत नव्हे-देवदूत ! नियोजित रस्त्यासह बोगदे रद्द करा; पर्यावरणप्रेमींची मागणी
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बालभारती ते पौड फाटा या दरम्यानच्या नियोजित रस्त्यास विरोध दर्शविण्यासाठी शहरातील पर्यावरणप्रेमींनी शनिवारी (दि.15) भरपावसात वेताळ टेकडी बचाव पदयात्रा काढली. वेताळ टेकडी भूत नव्हे-देवदूत यासह अन्य घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या नियोजित रस्त्यामुळे विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक कमी होईल, तसेच वाहनचालकांचाही वेळ व इंधन वाचेल, असा दावा करत महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली. मात्र, या रस्त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार असल्याचा आरोप करत पर्यावरणप्रेमींनी या विरोधात रणशिंग फुंकले. भाजप नेते आग्रही असलेल्या या रस्त्याला इतर राजकीय पक्षांनीही विरोध केल्याने प्रशासनाने निविदा उघडली नाही.

विरोधानंतरही हा रस्ता होणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन पर्यावरणप्रेमींनी शनिवारी सेनापती बापट रस्त्यावरील वेताळबाबा चौक ते बालभारती (खांडेकर चौक) या दरम्यान भरपावसात वेताळ टेकडी बचाव पदयात्रा काढली. या पदयात्रेत वेताळ टेकडी बचाव समितीसह विविध संस्था, पर्यावरणप्रेमींसह राज्यसभा खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, भाजपच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना (उद्धव ठाकरे) शहरप्रमुख गजानन थरकुडे, माजी नगरसेवक दीपक मानकर, पृथ्वीराज सुतार, मनसेचे हेमंत संभूस, आपचे डॉ. अभिजित पाटील आदी सहभागी झाले होते. 'वेताळ टेकडी वाचली पाहिजे, रस्ता नको-टेकडी हवी, वेताळ टेकडी भूत नव्हे-देवदूत,' अशा घोषणा देत ढोल ताशाचा गजरात ही पदयात्रा काढण्यात आली.

विकासाच्या नावाखाली महापालिका शहराच्या मध्यवर्ती भागातील टेकडी फोडून रस्ता व बोगदा करत आहे. ही टेकडी आपल्याला मिळालेला एक अमूल्य वारसा आहे. तेथील जैवविविधता, भूगर्भातील जलस्रोत यांचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे.
                                   – अ‍ॅड. वंदना चव्हाण, राज्यसभा सदस्य (राष्ट्रवादी)

वेताळ टेकडी बचाव आंदोलनात सर्वपक्षीय नेते सहभागी झाल्याने महापालिका प्रशासन जागे होईल आणि नियोजित रस्ता रद्द करेल. शहरात 900 हेक्टर बीडीपी जागा आरक्षित आहे. मात्र, यामध्ये 600 हेक्टर क्षेत्रावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्यामुळे प्रशासनाने अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी व शहरातील टेकड्या वाचवाव्यात.
                                    – प्रा. मेधा कुलकर्णी, माजी आमदार (भाजप)

काय आहेत मागण्या?
नियोजित बालभारती पौड फाटा रस्ता, दोन बोगदे आणि एचसीएमटीआर हे प्रकल्प शहराच्या पर्यावरणाला हानीकारक असल्याने तीनही प्रकल्प पुण्याच्या विकास आराखड्यातून काढून टाकावेत. वेताळ टेकडी नैसर्गिक वारसा जाहीर करून पूर्ण टेकडीला शून्य विकास क्षेत्र घोषित करावे, अशा मागण्या पर्यावरणप्रेमींनी केल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news