पोलिस गेले झोपी, चरस तस्कर बेड्यांसह फरार - पुढारी

पोलिस गेले झोपी, चरस तस्कर बेड्यांसह फरार

सारोळा : वैभव धाडवेपाटील

सहा किलो चरसची तस्करी करणारा आरोपीला खेडशिवापूर (ता. हवेली, जि. पुणे) येथे रंगेहात पकडण्यात आले होते. या आरोपीला पुढील तपासासाठी म्हापसा (गोवा) येथे नेले होते. मात्र, तो आरोपी खासगी हॉटेलमधून सोमवारी पहाटे साडेतीन वाजता हातातील बेड्यांसह पळून गेला. मुस्ताकी रजाक धुनीया (वय ३०, रा. नेपाळ) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, राजगड पोलिस ठाणे नसरापूर (ता. भोर, जि. पुणे) यांनी मुंबई-बंगळूर महामार्गावर खेडशिवापूर येथे शुक्रवारी (दि. ८) पहाटे एका लक्झरी बसमधील बॅगेतून सहा किलो ४५३ ग्रॅम चरस जप्त केले होते. त्यानंतर मुस्ताकी रजाक धुनिया याला पकडले. राजगड पोलिसांनी या सहा किलो चरसचे मुल्याकंन ३२ लाख दाखवले असले तरी अतंरराष्ट्रीय बाजारात त्याचे मुल्याकन साडेतीन कोटीहून अधिक आहे.

आरोपी मुस्ताकी याला न्यायालयात हजर केले. तो नेपाळचा असल्याने त्याची अंमली पदार्थाची तस्करी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू आहे का, याचा तपास करायचा आहे. त्यामुळे त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी केली. त्यानुसार पुढील तपासासाठी त्याला राजगड पोलिस व पुणे गुन्हे शाखेने संयुक्तपणे तपासासाठी गोव्याला नेले होते.

पुढील तपासासाठी रविवारी सकाळी म्हापसा (गोवा) येथे घेऊन गेले. तेथे त्यांनी खासगी हॉटेलमध्ये आरोपी मुस्ताकी धुनिया ठेवले होते. यावेळी ‘राजगड’चे पोलिस उपनिरिक्षक मनोजकुमार नवसरे, हवालदार महेश खरात, संतोष तोडकर, शरद धेंडे तर पुणे गुन्हे शाखेचे उपनिरिक्षक अमोल गोरे, मंगेश भगत, अमोल शेडगे, पुनम गुंड यांचा बंदोबस्त होता.

खासगी हॉटलमधील मुक्कामावेळी संबंधित हाद्दीतील म्हापसा पोलीसांना पत्र देऊन आरोपीला आपल्या कस्टडीमध्ये ठेवणे गरजे होते. पण ते न करता राजगड पोलिस व पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फक्त हातात बेड्या घालून आरोपीला आपल्या ताब्यात ठेवले. राजगड पोलिस व पुणे गुन्हे शाखेचे दोन अधिकारी व सहा पोलिस झोपल्याने सोमवारी पहाटे आरोपी मुस्ताकी धुनिया फरार झाल्याने पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केले जात आहे. गोव्यातील चरस रॕकेट, मुंबई, बिहार पटना व नेपाळ चरस रॕकेट या प्रकरणांचा आता पुढील तपास कसा करणार याबाबत संशय व्यक्त केली जात आहे. याबाबत आरोपी फरार झाल्याची म्हापसा पोलिसात तक्रार दिली आहे.

Back to top button