जातेडे (ता. मुळशी) येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात पौड पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक म्हणजे भावानेच भावाचा खून करून मृतदेह पुरून टाकला होता. या प्रकरणी पौड पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. गजानन विलास इढोळे असे मृताचे नाव असून, योगेश विलास इढोळे (वय २९, रा. वाशिम, जि. अकोला) व ओम उर्फ प्रविण आसरू मुटकुळे (रा. जातेडे, ता. मुळशी) अशी आरोपींची नावे आहेत. खुनाचा उलगडा झाल्याने दोन आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना दोन वर्षानंतर यश आले आहे.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेशचे तो राहत असलेल्या ठिकाणी एका मुलीशी प्रेमसंबंध होते. २०१८ मध्ये योगेशचा भाऊ गजानन हा वाशिमला गेला असता, योगेशने गजाननला मुलीशी ओळख करून दिली. त्यावेळी दोघांचे प्रेम जुळले. परंतु योगेशला या मुलीशी लग्न करायचे होते. मात्र तरीही गजानन हा मुलीला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी त्रास देत होता. हा राग मनात ठेवून गजाननने ही बाब प्रविणला सांगितली. प्रविणलाही ही गोष्ट खटकली.
त्यानंतर २०१९ मध्ये आरोपींनी गजाननला जातेडे येथे बोलावून घेऊन दारू पार्टी केली. गजाननला दारू पाजून त्याच्या डोक्यावर व गळ्यावर लोखंडी सळईने मारून त्याला जागीच ठार केले.
त्यानंतर आरोपीने मृताला ओढत नेऊन जवळ असलेल्या जंगलात नेऊन खड्डा करून मृतदेह पुरला होता. या प्रकरणी पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक मित्तेश घट्टे, पोलिस उप अधीक्षक राजेंद्र कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड, संजय शेडगे, संदीप सपकाळ, रवींद्र नागटिळक, अनिता रवळेकर, संतोष कालेकर, सिध्देश पाटील अधिक तपास करीत आहेत.