पुणे : ‘कॉसमॉस’मध्ये दोन सहकारी बँकांच्या विलिनीकरणावर शिक्कामोर्तब
पुणे; पुढारी वृत्तसेवा : येथील दि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये दोन सहकारी बँकांच्या विलिनीकरणावर गुरुवारी (दि.30) शिक्कामोर्तब झाले. त्यामध्ये मुंबई येथील दि साहेबराव देशमुख सहकारी बँक लिमिटेड आणि मराठा सहकारी बँक लिमिटेड या दोन्ही सहकारी बँकांच्या विलिनीकरणास बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सभासदांनी बहुमतांनी मंजुरी दिल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी दिली.
बँकेच्या पुणे विद्यापीठ रस्त्यावरील मुख्य कार्यालयात आयोजित सभेस बँकेचे उपाध्यक्ष सचिन आपटे व संचालक मंडळाचे सदस्य, व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षित ठिपसे आदींसह सभासद उपस्थित होते. या वेळी विलिनीकरणामागची भूमिका सांगताना काळे म्हणाले की, नजीकच्या काळात कॉसमॉस बँकेचे विस्तारीकरण करण्याचे नियोजन आहे. मुंबईस्थित दोन बँकांच्या विलिनीकरणामुळे कॉसमॉस बँकेचा विस्तार मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
दि साहेबराव देशमुख सहकारी बँकेच्या 11 शाखा असून, 244 कोटी रुपयांचा व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे मराठा सहकारी बँकेच्या 7 शाखा असून, एकूण व्यवसाय 162 कोटी रुपयांचा आहे. आतापर्यंत बँकेने 16 इतर लहान सहकारी बँकांचे विलिनीकरण करून घेतले आहे. बँकेतर्फे विलिनीकरणाचा प्रस्ताव लवकरच रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असल्याचे काळे यांनी सांगितले.