देहूगाव; पुढारी वृत्तसेवा : देहू देवस्थान संस्थानच्या वतीने मंदिरात गुढी उभी करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. विठ्ठल रखुमाई यांच्या मूर्तिस चंदनाची उटीही लावण्यात आली. संत तुकोबारायांचे भक्त वाल्मीक दवने, नीळकंठ मोरे यांच्या हस्ते नाना मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही उटी लावण्यात आली. उन्हाळ्यात या मूर्तींना गरम होऊ नये, त्यांना थंडावा मिळावा, यासाठी उन्हाळ्यात दोन ते तीन महिन्यांत साधारण सात ते आठ वेळा या मूर्तींना चंदनांची उटी लावली जाते, अशी माहिती देहू देवस्थान संस्थानच्या वतीने देण्यात आली.
रामनवमीला संजय महाराज मोरे (देहू), काळ अष्टमी, हैबत बाबा (आळंदी ) नरसिंह जयंती, रामभाऊ घाडगे (आळंदी) यांच्या वतीने चंदनांची उटी लावली जाते. अशाच प्रकारे आणखी तीन ते चार भाविकांच्या वतीने या स्वयंभू असलेल्या विठ्ठल रखुमाईंच्या मूर्तीस उटी (चंदनाचा लेप) चढविली जाते. त्यामुळे उन्हाळ्यात तीन ते चार महिने या मूर्तींना थंडावा मिळतो.