पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकात आरोग्य विभागासाठी 505 कोटी रुपयांची महसुली तरतूद करण्यात आली आहे. कोरोना काळापासून आरोग्य विभागासाठी दरवर्षी तरतुदीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, जास्तीत जास्त निधी खासगीकरणावर खर्च होणार असल्याचे दिसून येत आहे. वारजे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल खासगी संस्थेस डीबीएफओटी तत्त्वावर 30 वर्षे कराराने चालवायला देण्यास मान्यता देण्यात आली आहे. येथे 350 खाटांचे हॉस्पिटल तयार होणार असून, आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ पुरवण्याची जबाबदारी निविदाधारकावर राहणार आहे. त्याचप्रमाणे, वानवडी येथील केपीसीटी मॉलही पीपीपी तत्त्वावर चालवण्यास देण्यात येणार आहे. 100 बेडच्या रुग्णालयामध्ये ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड असणार आहेत. बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग या सुविधा कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
कोरोना काळातून धडा घेऊन महापालिकेच्या अंदाजपत्रकात आरोग्य विभागासाठी असलेली तरतूद वाढवण्यात आली. मात्र, निधीच्या विनियोगासाठी आवश्यक असणा-या नियोजनाचा अभाव पाहायला मिळत आहे. त्यामुळेच निधी आहे. मात्र, नियोजन नाही अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
अंदाजपत्रकात अर्बन 96 प्रकल्पांतर्गत बालस्नेही रुग्णालयासाठी निधी वितरित केला जाणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपकरणे, यंत्र, स्वच्छता, स्टेशनरी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मानधन आणि इतर खरेदीसाठी 62 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. मनपा हद्दीतील भटक्या कुत्र्यांची गणना करण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. अॅप विकसित करणे, कुत्र्यांची गणना यासाठी 12 महिन्यांना कालावधी देण्यात येणार आहे.