चाकण : पुढारी वृत्तसेवा : चाकण पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने चाकण एमआयडीसी परिसरातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला. दोघांना ताब्यात घेत पोलिसांनी तब्बल चार लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अशोक विलास खिल्लारे (वय 27, सध्या रा. भोसरी, मूळ रा. बीड), कबीर लालसिंग गौर ऊर्फ राहुल (वय 26, सध्या रा. आळंदी फाटा, गवते वस्ती, मूळ रा.आसाम) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
चाकण पोलिस ठाण्यात 10 मार्च रोजी पवन कुमार सिंह यांनी त्यांच्या कंपनीतून साडेतीनशे किलो वजनाचे तांब्याच्या धातूचे रोल चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद दिली होती. या प्रकरणाचा तपास करीत असताना चाकण पोलिसांनी परिसरातील सुमारे 50 पेक्षा जास्त ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेर्यातील चित्रीकरण तपासले. त्या वेळी सदर गुन्ह्यातील चोरटे घरफोडी करून रिक्षाने पळून गेल्याचे दिसले. त्यानंतर चाकण पोलिसांच्या तपास पथकाला चोरट्यांबाबत गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना रिक्षासह आळंदी फाटा परिसरात चोरीचा माल विक्रीसाठी ग्राहक शोधताना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व मुद्देमाल असा चार लाख 21 हजार 840 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.