पुणे : ’शिरसाई’च्या लाभक्षेत्राला अजून दोन आवर्तने मिळणार | पुढारी

पुणे : ’शिरसाई’च्या लाभक्षेत्राला अजून दोन आवर्तने मिळणार

नीलेश बनकर : 

शिर्सुफळ : बारामती तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांना वरदान ठरलेल्या जानाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेचे फेब—ुवारीमध्ये रब्बीसाठी एक आवर्तन सुटले होते. उन्हाळी हंगामातही आणखी दोन आर्वतने मिळणार असून, याचा शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असला आणि पाणीसाठा उपलब्ध असला, तरी एप्रिल-मे महिन्याच्या दरम्यान चार्‍यांच्या पिकांना तसेच पिण्यासाठीच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात होत असते, ते दूर होण्यासाठी या उन्हाळी आवर्तनाचा फायदा होणार आहे. फेब्रुवारीमध्ये सुटलेल्या आवर्तनाने जिरायत भागातील रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा या महत्त्वाच्या पिकांना दिलासा मिळाला आहे. उन्हाळी हंगामातील आवर्तनाचा पिण्याचे पाणी, चारा पिके, ऊस, तरकारी, काही फूल उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.

बारामती तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील शेतजमिनीला पाणी पुरविण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना राबविण्यात आल्या आहेत. जानाई-शिरसाई योजना मुठा उजवा कालव्याद्वारे कि.मी. 140 मधून शिर्सुफळ येथील तलावात पाणी सोडून भरण्यात येतो. या तलावातून पाणीउपसा करून शिरसाई योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.या योजनेद्वारे बारामती तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील 5730 हेक्टर सिंचन क्षेत्र / 6303 हेक्टर पीक क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळतो. 5303 हेक्टर सिंचन क्षेत्र / 5833 हेक्टर पीक ओलिताचे क्षेत्र आहे.

शिरसाई उजवा- डावा या दोन कालव्यांमध्ये उंडवडी सुपे, खराडवाडी, कारखेल, सोनवडी सुपे, जळगाव सुपे, अंजनगाव, जराडवाडी, उंडवडी कडेपठार, गोजुबावी, बर्‍हाणपूर, मेडद आणि शिर्सुफळ उजवा – डावा या दोन कालव्यांमध्ये साबळेवाडी, शिर्सुफळ, गाडीखेल, भोळोबावाडी अशा गावांना आवर्तने सोडण्यात येत असतात. शिर्सुफळ तलावाची 356 द.ल.घ.फू.साठवण क्षमता आहे.0.120 टी.एम.सी. इतका पाणीसाठी उपलब्ध असून, प्रत्यक्षात शिर्सुफळ तलावात 0.715 टी.एम.सी. पाणी मिळत असते. सध्या पूर्ण दोन आवर्तनासाठी पुरेल इतका पाणी उपलब्ध आहे. आवर्तनाच्या वेळी मागणीनुसार पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा होते असतो. ती अंदाजे 150 ते 200 द.ल.घ.फू. इतकी असते.

वर्षभरामध्ये या जिरायती भागांना तीन आवर्तने मिळतात. फेब्रुवारीमध्ये एक आवर्तन दिले आहे. अजून दोन आवर्तने मिळतील तसेच शेतकर्‍यांनी शेततळ्यामध्ये या आवर्तनाचे पाणी साठवून ठेवावे, तसेच ठिबकचा मोठ्या प्रमाणावर वापर केला पाहिजे. ऊस या पिकाऐवजी फळबागांची लागवड करून त्याला ठिबकद्वारे पाणी सोडावे, यामुळे पाण्याची बचत होऊन पाण्याची कमतरता भासणार नाही तसेच उत्पन्नातही वाढ होईल.
                                 – अमोल शिंदे, स्थापत्य अभियांत्रिकी, जलसंपदा विभाग

फेब्रुवारीमध्ये आवर्तन मिळाल्याने चालू पिकांना फायदा झाला आहे. एप्रिल व मेमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणावर गरज भासते. जलसंपदा विभागाने योग्य नियोजन करून आवर्तन सोडावे.
                                        – दिलीप आत्माराम साळुंखे, शेतकरी, गाडीखेल

Back to top button