पोलिस म्हणजे जरब, पोलिस म्हणजे गुंडांचा थरकाप, अशी होती एकेकाळी पोलिसांची प्रतिमा. मात्र, बेफान झालेल्या गुंडांकडून याच कर्तव्यदक्ष पोलिसांवर चक्क हात उगारण्याचे वाढते प्रकार, हा समाजाच्या द़ृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या दीड वर्षात तब्बल 48 पोलिसांवर पुण्यात हल्ले झाले असल्याचे पुढे आले आहे. वर्दीवर असलेल्या पोलिस अधिकार्यावर हल्ला करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली आहे. पोलिसांचा धाक उरला आहे की नाही? असाच सवाल उपस्थित झाला आहे. यामुळे नागरिकांना सुरक्षेची हमी देणारे पोलिसच आता शहरात सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे. मागील दीड वर्षात 48 पोलिसांवर शहरात हल्ले झाले आहेत. त्यामध्ये वाहतूक विभागातील पोलिसांचे प्रमाण अधिक असून, मारहाण करण्यापासून ते वर्दी फाडण्यापर्यंतचे प्रकार घडले आहेत.
पोलिसांवर गुंडांकडून हल्ले होणे निश्चितच सामाजिक स्वास्थ्यासाठी चांगले नाही. त्याचा परिणाम पोलिसांच्या मनोबलावर होतो. खाकी वर्दीचा धाक आणि दरारा कायम राहिला, तरच गुन्हेगार आणि समाजकंटक त्यांच्या मर्यादेत राहतील. सर्वसामान्य जनतेच्या मनात सुरक्षितता आणि विश्वासाची भावना निर्माण होईल. मात्र, मागील काही महिन्यांमध्ये थेट खाकी वर्दीवरच हात टाकण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. एरवी वाहतूक पोलिसांसोबत वाद घालून त्यांना धक्काबुक्की करण्याच्या घटना घडत असतात. परंतु आता गुंडांकडून कोयत्याने वार करण्यापासून ते बंदुकीचा बार काढण्यापर्यंत मजल होऊ लागली आहे. एवढेच नाही, तर अलीकडच्या काळात रस्त्यावर थेट खाकी गणवेशातील पोलिसांना मारहाण करण्यापर्यंत अनेकांची मजल जाऊ लागली आहे. कर्तव्य बजावण्यास गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ करून नोकरी घालविण्याची धमकी दिल्याच्या घटना घडत आहेत. पोलिसांनाच जर मारहाण होऊ लागली तर खाकीचा दरारा राहील काय? असा सवाल उपस्थित केला जातोय.
जुलै महिन्यात वाहतूक विभागातील एका महिला सहायक पोलिस निरीक्षकाला अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मद्यप्राशन करून गाडी चालविणार्या एका दारुड्याने हे कृत्य केले होतो. मात्र, वेळीच पोलिसांनी प्रसंगावधान दाखविल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. तर, रविवारी वानवडी पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर सराईत गुंडाने कोयत्याने हल्ला केला. भर दिवसा हा प्रकार घडला. कोयता लागल्याने गायकवाड यांच्या डोक्यात मोठी जखम झाली आहे.
पुढे सोलापूर ग्रामीण आणि गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करीत मुख्य आरोपी निहालसिंग मन्नूसिंग टाक आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. निहालसिंग याने यापूर्वी देखील गुन्हे शाखा युनिट-3च्या पथकावर यवत येथील मानकोबावाडा परिसरात गोळीबार केला होता. त्यामुळे तो किती निर्ढावलेला आहे, हे दिसून येते.
पोलिसांवर होणार्या हल्ल्यावर बोलताना माजी सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे सांगतात की, पोलिसांचा धाक असणे गरजेचे आहे. हे तेव्हाच होईल जेव्हा वरिष्ठांचा पाठिंबा असेल. पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप नको. पोलिसांनी खात्याशी इमानदार राहून काम करणे गरजेचे आहे. पोलिसांच्या कामात आर्थिक हेतू नसावा. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक कायम राहिला पाहिजे. नागरिकांनी पोलिसांवर हात उचलणे योग्य नाही. तो कायद्याचा आणि जनतेचा रक्षक आहे. त्यामुळे त्यांचा आदर राखला जाणे आवश्यक आहे. तसेच, पोलिसांनी देखील जनतेला सन्मान दिला पाहिजे. पोलिसिंग करताना कर्मचार्यांना आपले वरिष्ठ आपल्या पाठीशी उभे राहतील का? याबाबत संभ—म असतो. त्यांच्या मनात वरिष्ठांकडून कारवाई होण्याची भीती असते. त्यामुळे वरिष्ठांनी देखील त्यांच्यावर विश्वास ठेवत संवाद साधणे आवश्यक आहे.