मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृतसेवा : काठापूर बुद्रुक येथील घोडनदी काठावरील वीज पंपांच्या पाच केबलची पुन्हा एकदा चोरी झाली. केबलची तसेच शेतीपंपाची वारंवार चोरी होत असल्यानं या भागातील शेतकरी वैतागले आहेत. निवृत्ती करंडे, अशोक जोरी, सखाराम ढमाले, बबनराव वाळुंज, अमोल वाळुंज, दत्ता वाळूंज, महेंद्र पोखरकर या पाच शेतकर्यांच्या शेतीपंपाची केबल चोरट्यांनी पळविली.
ही घटना बुधवारी (दि. 1) घडली. यामुळे एकूण 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सातत्याने केबलची चोरी होत असल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. या घटनेबाबत भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले म्हणाले, घोड नदीमुळे अनेक गावे बागायती झाली आहेत.
नदीकाठच्या गावांमध्ये वीज पंपाच्या माध्यमातून शेतकर्यांनी पाणी शेतापर्यंत नेले आहे. नदीकाठच्या गावांमध्ये वारंवार वीज पंपांच्या केबलची चोरी होत आहे. त्यामुळे येथील शेतकरी वैतागला आहे. चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी लक्ष घालून केबलचोरांना अटक करावी,अशी मागणी आंबेगाव तालुका खरेदी- विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे.