जेजुरी; पुढारी वृत्तसेवा : जेजुरी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याचे मंगळवारी (दि. 13) मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण करण्यात आले. यात 127 कोटी 27 लाख रुपयांच्या कामांचा समावेश असल्याचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. सार्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या जेजुरीच्या श्री खंडोबादेवाचे मंदिर, कडेपठार मंदिर, शहरातील सर्व पौराणिक व इतिहासकालीन मंदिरे व जेजुरी शहराचा विकास आराखडा महाराष्ट्र शासनाने मंजूर केला आहे.
या विकासकामांच्या पहिल्या टप्प्यात मुख्य मंदिराची तटबंदी जतन व दुरुस्त करणे, दीपमाळेची दुरुस्ती, उत्तर, पूर्व आणि पश्चिम दिशेच्या पायर्या, 13 कमानी, होळकर तलाव आणि पेशवे तलावाची दुरुस्ती, कडेपठार येथील खंडोबा मंदिराची दुरुस्ती, मल्हार गौतमेश्वर मंदिर, बल्लाळेश्वर मंदिर, लवथळेर्श्वर मंदिर दुरुस्ती, बानूबाई मंदिर दुरुस्ती आदी कामांचा यात समावेश आहे. याशिवाय परिसर विकासात विद्युत सोयी, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, धूळ गोळा करण्याचे यंत्र, दिव्यांग लोकांसाठी कक्ष आणि चाकाच्या खुर्च्या, दर्शनबारी, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा उपकरणे आदी बाबींचा समावेश आहे, असेही विजय शिवतारे यांनी सांगितले.
ऐतिहासिक काळात चारशे वर्षांपूर्वी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या श्री खंडोबादेवाच्या जेजुरीगडाचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर सन 2018 मध्ये आपण राज्यमंत्री असताना जेजुरी येथे जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात बैठक घेऊन सुमारे 400 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला होता. आज यातील पहिल्या टप्प्यातील कामासाठी 127 कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे.
विजय शिवतारे, माजी राज्यमंत्री