एकमेकांच्या पायात पाय टाकण्याची काँग्रेसमध्ये परंपरा, मंत्री सुधीर मुनगंटींवार यांची टीका | पुढारी

एकमेकांच्या पायात पाय टाकण्याची काँग्रेसमध्ये परंपरा, मंत्री सुधीर मुनगंटींवार यांची टीका

बारामती, पुढारी वृत्तसेवा: काँग्रेसमध्ये एकमेकांच्या पायात पाय टाकण्याची परंपरा आहे. या परंपरेचे जे पाईक असतील ते पुढे जातील. बाळासाहेब थोरात यांनी काॅंग्रेसच्या गटनेते पदाचा राजीनामा दिल्याबाबत मी काही बोलू शकत नाही. मात्र त्यांची भाजपशी जवळीक आहे असे मला वाटत नाही, असे मत भाजप नेते व वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी व्यक्त केले.

बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. बुधवारी (दि. ८) त्यांनी बारामती कृषि विज्ञान केंद्राला भेट दिली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शिक्षक आणि पदवीधर विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला. यावर आमचे विचार मंथन सुरू आहे. सत्तेसाठी काही पण अशी आमची भूमिका नाही, तर सत्यासाठी काही पण या भावनेने आम्ही काम करत आहोत. विरोधात असताना संसदीय आयुधे वापरून आम्ही जनतेचा आवाज नेहमी बुलंद केला आहे. त्यामुळे शिक्षक, पदवीधर निवडणुकीचे आत्मचिंतन करताना आम्ही केवळ जिंकलो किंवा हरलो याचा विचार करत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात त्याप्रमाणे निवडणुका जिंकणे हे आमचे लक्ष्य नसून गोरगरिबांचे हृदय जिंकणे हे आमचे लक्ष्य आहे. चार निवडणुका हरल्या म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये काही गडबड आहे असं म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही, असेही यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

विरोधकांकडून महापुरुषांच्या नावाने राजकारण

राज्यात विरोधकांना महागाई बाबत काही घेणं देणं नाही. ते केवळ महापुरुषांच्या नावाने राजकारण करत आहेत. महागाईचा विषय असेल तर त्याबाबत विधासभेत विषय मांडून चर्चा घडवता येते. पण त्यांना ते होवू द्यायचे नाही असे म्हणत मुनगंटीवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

तेव्हा रडीचा डाव कोण खेळले?

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे सरकारने रडीचा डाव खेळू नये असे वक्तव्य केले होते. यावर बोलताना मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, किरीट सोमय्या असो वा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा आदित्य ठाकरे असो, कोणावर ही असा प्रकार होता कामा नये. असे प्रकार करणारे कोण आहेत, हे बघितले पाहिजे. पुण्यात सोमय्या गेले होते, तेव्हा रडीचा डाव कोणी केला होता असा सवाल त्यांनी केला. तत्वज्ञान सांगण्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे नाही तर लोक राजकीय नेत्यांना ढोंगी म्हणतील, या शब्दात त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले.

राज्य चालायचे थांबलेय का?

मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने राज्य चालायचे थांबलेय का, असा प्रति सवाल मुनगंटीवार यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एक वर्ष झाल्याच नाही. म्हणून काय काम थांबले आहे का…? मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही म्हणून राज्य अधोगतीकडे चालले आहे? प्रगती थांबली असे नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व १८ मंत्री अशा २० जणांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्याची यादी मी देऊ शकतो असेही मुनगंटीवार म्हणाले.

सौर उर्जेसाठी ५० हजार कोटींचा प्रकल्प

अनेक राज्यांनी शेतकऱ्यांना मोफत सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, पंजाब सरकारने शेतकऱ्यांना जेव्हा मोफत वीज दिली होती, त्यानंतर त्या राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली. वीज मोफत देण्याऐवजी महाराष्ट्र सरकारने सौर ऊर्जेचा वापर केला. तर शेतकऱ्यांना अल्प दरात वीज मिळू शकते. या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी ५० हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेतला आहे. यामधून शेतकरीच वीज उत्पादक होऊ शकेल, असा हा प्रकल्प असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

चांगल्या कामाच्या कौतुकात गैर काय ?

भाजपचे वरिष्ठ नेते बारामतीत आले की पवारांचे कौतुक करतात. त्यामुळे स्थानिक नेत्यांना पवारांच्या विरोधात लढताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, अशी तक्रार दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्या दरम्यान केली होती. याबाबत माध्यमांनी सुधीर मुनगंटीवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले, चांगल्या कामाचं कौतुक करणं ही आपली परंपरा आहे. मी एखादे चांगले काम करतो तेव्हा विरोधक असताना ते देखील माझे कौतुक करतात. महाराष्ट्राची ही वैशिष्ट्यपूर्ण परंपरा खंडित होता कामा नये. मात्र जी बाजू चुकीची आहे. अन्यायाचा भाव आहे, त्याचे समर्थन कोणीही करू नये.

Back to top button