पुणे : खाद्यतेलांत स्वस्ताई; चार महिन्यांत किलोमागे 15 ते 30 रुपयांची घसरण | पुढारी

पुणे : खाद्यतेलांत स्वस्ताई; चार महिन्यांत किलोमागे 15 ते 30 रुपयांची घसरण

शंकर कवडे

पुणे : स्वयंपाकगृहात चपातीपासून खाद्यपदार्थ तळण्यापर्यंत वापरल्या जाणार्‍या खाद्यतेलांच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने घसरण होत आहे. देशाला सध्या कमी दरातील आयाती खाद्यतेलांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत आहे. परिणामी, खाद्यतेलांच्या दरात मागील चार महिन्यांतील सर्वांत मोठी घट झाली असून, दिवाळीपूर्वी 180 रुपये प्रतिकिलोवर गेलेले खाद्यतेल तीस रुपयांनी घसरून 150 रुपये प्रतिकिलोपर्यंत आले आहे.

जगभरातील बहुतांश देशांतील अर्थव्यवस्थेमध्ये मंदीसदृश वातावरण निर्माण असून, त्यांची बिकट अवस्था झाली आहे. तसेच, युक्रेन व रशिया यांच्यामधील युध्दजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात घबराट निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने सोयाबीन तेलाचा टीआरपी कोटा मार्चपासून रद्द केला आहे. मात्र, सूर्यफुलाचा तो अद्यापही सुरू ठेवल्याने खाद्यतेलांमध्ये स्वस्ताई आली आहे.

इंडोनेशिया व मलेशिया येथील स्थानिक बाजारेपठांमध्ये पामोलीन तेलाचे दर मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीन, पामतेल तसेच सुर्यफूल तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे देशाला सध्या कमी दरातील आयाती खाद्यतेलांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत आहे. यास र्वांमुळे शहरातील मार्केट यार्डातील भुसार बाजारात खाद्यतेलांच्या दरात 15 किलोमागे 400 ते 500 रुपये, तर किलोमागे 15 ते 30 रुपयांची घसरण होऊन खाद्यतेलां मध्ये स्वस्ताई आल्याचे चित्र आहे.

शेंगदाण्यासह तेलाच्या निर्यातीमुळे दिलासा नाही
देशभरात यंदा शेंगदाण्याच्या लागवडीत वाढ होऊन उत्पादनातही वाढ झाली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात शेंगदाण्याला मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच, चीनकडून शेंगदाणा तेलाला मोठी मागणी आहे. त्यामुळे देशातून मोठ्या प्रमाणात शेंगदाणा व तेलाची निर्यात होत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी शेंगदाण्याच्या तेलात झालेली घसरण थांबून शेंगदाणा तेलाने पुन्हा तेजीकडे वाटचाल
सुरू केली आहे.

दररोज तीनशे टन तेलाची आवश्यकता
शहरात घरगुती वापरासह हॉटेलिंग क्षेत्राकडून खाद्यतेलाला मोठी मागणी राहते. प्रत्येकाच्या घरात कमीत कमी 50 ग्रॅम खाद्यतेल दररोजच्या जेवणात वापरात येते. यामध्ये सर्वाधिक सोयाबीन, सूर्यफूल व त्यापाठोपाठ पामतेलाला मागणी राहते. पुणे शहरात दररोज तीनशे टनांच्या जवळपास खाद्यतेलाची विक्री होते.

खाद्यतेलामागे महिन्याला 150 रुपयांचा दिलासा
सामान्यत: चार सदस्यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबाला महिन्याला 5 लिटर तेलाची आवश्यकता भासते. त्यासाठी त्याला महिन्याला 180 रुपये दराने 900 रुपयांपर्यंत खर्च करावा लागत होता. मात्र, आत्ता तेलाचे किलोचे दर 150 रुपयांपर्यंत आल्याने पाच लिटरसाठी त्याला 750 रुपये खर्च करावे लागणार असून, त्यामधून 150 रुपयांची
बचत होत आहे.

येथून होतो खाद्यतेलांचा पुरवठा
रशिया, युक्रेन – सूर्यफूल तेल
अमेरिका, अर्जेंटिना – सोयाबीन तेल
स्वित्झर्लंड, – पामोलीन तेल
इंडोनेशिया, मलेशिया

खाद्यतेलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे
खाद्यतेल ऑक्टोबर 2022 – फेब—ुवारी 2022
सोयाबीन तेल 155 ते 160 -135 ते 145
सूर्यफूल रिफाइंड तेल 170 ते 180 -140 ते 150
पामतेल 130 ते 140- 110 ते 120
शेंगदाणा तेल 165 ते 180 -175 ते 180
रिफाइंड तेल 170 ते 180 -180 ते 190
वनस्पती तूप 110 ते 130- 90 ते 120
खोबरेल तेल 140 ते 160 -140 ते 160

खाद्यतेलांमध्ये मागील काही दिवसांत आलेल्या तेजीमुळे स्वयंपाकघराचे बजेट बिघडले होते. आत्ता खाद्यतेल 30 रुपयांनी स्वस्त झाल्याने काहीअंशी दिलासा मिळणार आहे. खाद्यतेलाप्रमाणेच अन्य वस्तूंचे महागडे दरही खाली येऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
                      – ज्योती क्षीरसागर-धोत्रे, गृहिणी, सुभाषनगर, पुणे

आंतरराष्ट्रीय बाजारातील विविध घडामोडींमुळे खाद्यतेलांच्या दरात मंदी आली आहे. शेंगदाणा तेल वगळता सर्वप्रकारच्या खाद्यतेलांच्या दरात किलोमागे 15 ते 30 रुपयांनी घसरण झाली आहे. सध्याची परिस्थिती पाहता पुढील काही दिवस हेच दर कायम राहतील, अशी शक्यता आहे.
                       – कन्हैयालाल गुजराथी, खाद्यतेलांचे व्यापारी, मार्केट यार्ड

Back to top button