पुणे : हातगाडीसाठी आरोग्यमंत्री थेट क्षेत्रीय कार्यालयात | पुढारी

पुणे : हातगाडीसाठी आरोग्यमंत्री थेट क्षेत्रीय कार्यालयात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केलेली अनधिकृत हातगाडी सोडविण्यासाठी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी थेट महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय गाठल्याची घटना सोमवारी (दि. 6) घडली. क्षेत्रीय कार्यालयात गेलेल्या मंत्रिमहोदयांनी कारवाई केल्याप्रकरणी अधिकार्‍यांना धारेवर धरत संबंधितांवर कारवाई करण्यासाठी दबाव टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली.

धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी-अधिकारी नेहमीप्रमाणे सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास कामात व्यस्त होते. त्या वेळी अचानक क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गाड्यांचा ताफा दाखल झाला. आरोग्यविषयक कारणासाठी मंत्रिमहोदय कार्यालयात आले असतील, अशी कुजबुज कर्मचार्‍यांमध्ये सुरू झाली.

मात्र, आरोग्यमंत्री आरोग्याच्या कामासाठी नव्हे, तर अतिक्रमण विभागाने संभाजीनगर येथे कारवाई करून जप्त केलेली पदपथावरील अनधिकृत हातगाडी आणि टेम्पो सोडविण्यासाठी आल्याचे काही वेळातच सर्वांना कळाले. कारवाई करून जप्त केलेली हातगाडी आणि टेम्पो तात्काळ सोडून द्या, असे म्हणत अधिकार्‍यांना धारेवर धरले. त्यावर अधिकार्‍याने कारवाई केलेली हातगाडी व टेम्पो अनधिकृत आहेत. त्यामुळे कायदेशीरच कारवाई केली आहे. नियमानुसार दंड भरावा लागेल, त्यानंतर ते सोडले जाईल, अशी भूमिका घेतली.

अधिकार्‍याच्या उत्तराने रागावलेल्या मंत्रिमहोदयांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना फोन करून संबंधित अतिक्रमण निरीक्षकावर कारवाई करावी, त्याला निलंबित करावे, असे आदेश दिले. मात्र, वरिष्ठांनीही तपासणी करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. अनधिकृत हातगाडी सोडविण्यासाठी मंत्रिमहोदयांनी दाखवलेल्या तत्परतेची चर्चा धनकवडी परिसरात रंगली होती. यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन घेतला नाही. दरम्यान, अशा अनधिकृत कामासाठी मंत्रिपदाचा दुरुपयोग करणे चुकीचे असल्याची टीकाही नागरिकांमधून केली जात आहे.

Back to top button