पुणे : ऊसतोड मजुरांची मुले शिक्षणापासून दूरच | पुढारी

पुणे : ऊसतोड मजुरांची मुले शिक्षणापासून दूरच

खोर : पुढारी वृत्तसेवा :  ऊसतोड मजुरांच्या मुलांची शाळा शिकण्याची इच्छा व धडपड असते. मात्र, घरची हलाखीची परिस्थिती आणि कामानिमित्त सातत्याने होणारे स्थलांतर यामुळे या मुलांना शिक्षण घेता येत नाही. आधुनिकतेच्या युगातही पारंपरिक जीवन जगण्यात रममाण झालेल्या या मजुरांची मुले शिक्षणापासून दूर असल्याचे वास्तव आहे. अशीच एक घटना दौंड तालुक्यातील देऊळगावगाडा परिसरातील विठ्ठलवाडी येथे उघडकीस आली. विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागे असलेल्या उसाच्या फडात तोड सुरू होती. नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी शाळेत तयारी सुरू होती. 3

या वेळी शाळेच्या पाठीमागे उसाच्या फडात आपल्या ऊस तोडणार्‍या कामगार आई-वडिलांना मदत करणार्‍या मुलांचे लक्ष वेधले. त्यामुळे ही मुले शाळेच्या आवारात घुटमळू लागली. या मुलांकडे शाळेतील शिक्षक युवराज घोगरे यांचे लक्ष गेले. त्यांनी या मुलांना जवळ बोलावले. त्यातील एकच मुलगा घोगरे यांच्याकडे आला. त्याला घोगरे यांनी बोलते केले. त्याने आपल्याला शिकण्याची इच्छा असूनही शाळेत जाता येत नसल्याची खंत व्यक्त केली. यावर घोगरे यांनी त्याला खाऊ दिला. त्यानंतर तो मुलगा तेथून निघून गेला.
प्रजासत्ताक दिनी प्रभात फेरी झाल्यानंतर घोगरे हे विद्यार्थांच्या रांगा करत असताना ऊसतोड मजुराचा मुलगा शाळेत आला.

’सर, मी आलोय,’ असे तो म्हणाला. त्याने रंगीत ड्रेस घातला होता. घोगरेंनी विद्यार्थ्यांच्या रांगेत त्याला उभे केले. या वेळी त्याने सर्व कार्यक्रम पाहिला. कार्यक्रम संपल्यानंतर तो घोगरेंना म्हणाला, ’सर, मी कोणत्या वर्गात बसू?’ त्यावर घोगरे यांनी त्याला त्यांच्या वर्गात बसवले आणि शाळेत दररोज येण्यास सांगितले. दुसर्‍या दिवशी नेहमीप्रमाणे शाळा भरली. मात्र, तो मुलगा शाळेत आला नाही. त्यावर घोगरेंनी त्या मुलाचा परिसरात शोध घेतला. दुसर्‍या दिवशी त्या मुलाचे कुटुंब ऊसतोडणीसाठी परत आल्याचे घोगरेंना समजले. घोगरेंनी त्या मुलाच्या आई-वडिलांची भेट घेतली व त्यास शाळेत प्रवेश घेण्यासाठी गळ घातली. मात्र, आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने व ऊसतोडीसाठी वारंवार होत असलेल्या स्थलांतरामुळे मुलांना शिक्षण देऊ शकत नसल्याचे त्याच्या आई-वडिलांनी सांगितले. अशीच स्थिती अनेकांची असल्याने या मजुरांची मुले शिक्षणापासून दूर राहत आहेत. या मुलांची शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष जमिनीवर काम करणे गरजेचे आहे. अन्यथा शिक्षणाची वाहती गंगा या मुलांच्या झोपड्यांपर्यंत कधीच पोहोचणार नाही, हे वास्तव आहे.

Back to top button