पुणे : आता मुलींशी पंगा पडणार महागात ! ; सहावी ते बारावीच्या मुलींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे | पुढारी

पुणे : आता मुलींशी पंगा पडणार महागात ! ; सहावी ते बारावीच्या मुलींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे

गणेश खळदकर : 

पुणे : समग्र शिक्षांतर्गत राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20,259 उच्च प्राथमिक आणि 1,279 माध्यमिक अशा एकूण 21 हजार 538 शाळांमधील सहावी ते बारावीच्या मुलींना राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये मुलींना मार्शल आर्ट प्रशिक्षकांकडून कराटे, बॉक्सिंग, किक-बॉक्सिंग आदी प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुलींशी पंगा घेण्याचे महागात पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिकांच्या आयुक्तांना दिलेल्या निर्देशानुसार, स्व-संरक्षण प्रशिक्षणाद्वारे, मुलींना मानसिक, बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या पुरेसे सक्षम बनवण्याची गरज आहे. जेणेकरून त्या संकटाच्या आणि असुरक्षिततेच्या वेळी स्वतःचे संरक्षण करू शकतील. हिंसाचार करणार्‍यांचा मुकाबला करण्यासाठी मुली तयार आहेत.

त्यासाठी मुलींना सर्व पैलूंमध्ये सक्षम करणे, कोणत्याही प्रकारच्या कठीण परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी मुलींना स्वयं कौशल्यांत पारंगत करणे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व जागरुकता विकसित करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. विद्यार्थिनींना गुन्हेगारीविरुद्ध लढण्यासाठी सक्षम करणे हे या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आहे. आजच्या आधुनिक युगातही विद्यार्थिनी पूर्णपणे सुरक्षित नाहीत. त्यामुळे विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व तंत्र यांचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी अनुभवी मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांकडून मुलींनी सुरक्षित वातावरणात व्यावहारिक संरक्षण तंत्र शिकणे आवश्यक आहे.

विद्यार्थिनींसाठी हा उपयुक्त संरक्षण तंत्र कार्यक्रम आत्मनिर्भर बनवून तणाव कमी करण्यासाठी त्यांनी स्व-संरक्षण कौशल्ये शिकण्याचा उत्तम मार्ग असेल. त्यासाठीच इयत्ता सहावी ते बारावीत शिकणार्‍या मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी पुरवठाधारकाची निवडदेखील करण्यात आली आहे. शाळेतील सर्व विद्यार्थिनींचे प्रशिक्षण दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

कसे असणार स्वसंरक्षण प्रशिक्षण…

साधारण 100 तासांचे प्रशिक्षण होणार
प्रशिक्षण शाळेच्या वेळेत होणार
नियमित शिक्षक समन्वयक असतील आणि प्रशिक्षणार्थी म्हणून
प्रशिक्षणात सहभागी होतील
प्रशिक्षण ताणविरहित वातावरणात होणार
शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती दक्षता घेणार
काय असणार प्रशिक्षणात….
प्रशिक्षकांमार्फत मार्शल आर्टच्या किमान एक शैली/प्रकारात विशेष/कुशल (तायक्वांदो, वुशू, कराटे, ज्युडो, वेस्टर्न बॉक्सिंग, किक-बॉक्सिंग, मुए थाई, जिउ-जित्सू (किंवा जुजुत्सु), क्राव मागा, एकिडो, जी कुने डोफोरॅण्ड आणि भारतीय मार्शल आर्टचे कोणत्याही स्वरूपाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना सेवा पुरवठादाराकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Back to top button