कसबा, चिंचवड बिनविरोधचा प्रस्ताव ‘मविआ’ने फेटाळला | पुढारी

कसबा, चिंचवड बिनविरोधचा प्रस्ताव ‘मविआ’ने फेटाळला

मुंबई / पुणे, पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. आमदाराच्या निधनानंतर तेथील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची राज्याची परंपरा आहे. हीच परंपरा सर्वांनी जपावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केले आहे. मात्र महाविकास आघाडीने ही मागणी फेटाळून लावत पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय रविवारी घेतला.

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. या पार्श्वभूमीवर 26 फेब्रुवारीला होणार्‍या पुण्यातील कसबा आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या दोन्ही जागांवरील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप – शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः विरोधकांना फोन करून चर्चा केली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना त्यांनी फोन केले.

अनेक ठिकाणी आमदारांचे निधन होते. त्यानंतर त्या जागेवरील पोटनिवडणुकीमध्ये विरोधक आपला उमेदवार उभा करत नाहीत. तेथील निवडणूक बिनविरोध केली जाते. तशी परंपरा आहे. अंधेरीमध्येही नुकतीच पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला आम्ही प्रतिसाद दिला होता. त्यानंतर अंधेरी येथील निवडणूक बिनविरोध झाली. हीच परंपरा सर्वांनी जपावी आणि कसबा, चिंचवड येथील पोटनिवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती आपण केली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.

या चर्चेनंतर राज ठाकरे यांनी प्रतिसाद देत ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांना केले. मात्र, अजित पवार यांच्यासह नाना पटोले, संजय राऊत यांनी निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे सांगत बिनविरोधची विनंती फेटाळून लावली.

बिनविरोध निवडणुकीचे डोक्यातून काढावे : अजित पवार

मुंबई येथील अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार दिला नाही म्हणजे बाकीच्या सर्व निवडणुका बिनविरोध होतील हे भाजप – शिंदे गटाने डोक्यातून काढावे, अशा शब्दांत अजित पवार यांनी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी धुडकावून लावली. शेवटी लोकशाही आहे. जनता ज्यांना निवडून द्यायचे, त्यांना निवडून देईल, असेही अजित पवार म्हणाले.

पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचे कारण नाही. ही लोकशाही आहे. त्यांनी याआधी कोल्हापूर उत्तर, पंढरपूर, देगलूर येथील पोटनिवडणुका बिनविरोध होऊ दिल्या नव्हत्या, अशी आठवण अजित पवार यांनी सत्ताधार्‍यांना करून दिली.

नाना पटोले यांनीही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रश्नच नाही. कसबा येथे काँग्रेस आपला उमेदवार देणार आहे, असे स्पष्ट केले. येथे भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिलेली नाही. भाजपने अन्य उमेदवार दिल्याने त्यांच्यातच नाराजी निर्माण झाली आहे, असेही पटोले म्हणाले.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला आहे. कसबा आणि चिंचवड मध्येही वेगळा निकाल लागणार अशी चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुका होणारच असे स्पष्ट केले.

विरोधक विनंतीला मान देतील : फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कसबा आणि चिंचवड या पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची विनंती आम्ही विरोधी पक्षाला केली आहे. ते या विनंतीला मान देतील, असा विश्वास रविवारी व्यक्त केला. आम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करीत आहोत. एखाद्या आमदाराचे निधन झाले तर तेथे उमेदवार न देता ही निवडणूक बिनविरोध करण्याची राज्याची परंपरा आहे. ही परंपरा विरोधक पाळतील, असे फडणवीस म्हणाले. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

Back to top button