पुणे : नोकरीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार | पुढारी

पुणे : नोकरीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

महाळुंगे : पुढारी वृत्तसेवा :  नोकरी देण्याच्या आमिषाने कंपनी मालकाने एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. तसेच, तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेने पोलिसांत तक्रार देण्याचा इशारा दिला असता, कंपनीच्या मालकाच्या मित्राने तिचा खून करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यातील महाळुंगे गावाच्या हद्दीत घडला. कंपनीचा मालक विजयकुमार जनार्दन पोतदार (वय 55, रा. संकेश्वर डाईन आयकॉन, रावेत, पुणे) आणि त्याचा साथीदार मिथुन जोगेंदरकुमार दास (वय 28, सारा सिटीसमोर, खराबवाडी, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी 19 वर्षीय तरुणीने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी नोकरीच्या शोधात होती. तिच्या मैत्रिणीने तिला विजयकुमार पोतदारच्या कंपनीबद्दल माहिती दिली. त्यानुसार फिर्यादीने विजयकुमारशी संपर्क साधून नोकरीची गरज असल्याचे सांगितले. मात्र, विजयकुमारने कामाचे आमिष दाखवून फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केले. तसेच, ’मोबाईलमध्ये तुझे फोटो आहेत, ते मी व्हायरल करीन,’ अशी धमकी दिली. त्यानंतर विजयकुमार हा वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून, तसेच वेगवेगळ्या लोकांमार्फत फोन करून फिर्यादीला त्रास देऊ लागला.

फिर्यादीने तुझी पोलीस स्टेशनला तक्रार करणार असल्याचे विजयकुमारला सांगितले. त्यावर विजयकुमारने त्याचा मित्र मिथुनला फिर्यादीचा मोबाईल नंबर दिला. मिथुनने फिर्यादीस फोन करून ’विजयकुमारबरोबर काय केले आहे, मला माहीत आहे. तू जर त्याच्याविषयी कोणाला काही सांगितले. तर, तुझा खून करीन,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे तपास करीत आहेत.
..

Back to top button