पुणे : सत्ता असताना विरोधकांना अडचणीत आणले नाही : अजित पवार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसने नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात दोन केसेस केल्या गेल्या. सत्ता असताना तिचा गैरवापर करून मी कधीही कोणाला जाणीवपूर्वक अडचणीत आणले नाही, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी स्पष्ट केले. राजकारणात विरोधात असले, तरी राजकीय द्वेषातून कोणी त्रास देऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कसबा पेठ मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची बैठक पवार यांनी पुण्यात घेतली. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, नऊ राज्यातील विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन केंद्रीय अर्थसंकल्प मांडला आहे. कर्नाटकमध्ये निवडणूक असल्याने तेथे साडेतीन हजार कोटी रुपये दिले. महाराष्ट्रातून सर्वाधिक कर जमा होत असताना अन्य राज्यांना अधिक रक्कम देण्यात आली. शेतक-यांसाठी फारसे काही केलेले नाही. प्रत्येक पालकमंत्र्याची कामाची पद्धत वेगळी असते. मी दर शुक्रवारी पुण्यात बैठक घेत असे. मात्र, मी कोणाचीही तुलना करीत नाही, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.
पोलिसांच्या बक्षीस योजनेवर टीका
शहरातील वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी पुणे पोलिसांनी पोलिस अधिकारी व कर्मचार्यांसाठी गुन्हेगाराला पकडा आणि बक्षीस मिळवा, अशी अनोखी योजना सुरू केली. मात्र, या योजनेवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली. गुन्हेगारांना पकडणे हे पोलिसांचे कामच आहे. त्यांना आमिष दाखवू लागलात, तर ते कामच करणार नाहीत, असे मत पवार यांनी व्यक्त केले.
पूर्व आणि पश्चिम विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त यांनी बक्षीस योजनेबाबत आदेश काढलेले आहेत. ’गुन्हेगाराला पकडा आणि बक्षीस मिळवा,’ या अनोख्या योजनेनुसार, फरार आरोपीस पकडल्यास दहा हजार रुपयांचे बक्षीस, पाहिजे असलेला आरोपी पकडल्यास पाच हजार रुपयांचे, गंभीर अशा मोक्कातील आरोपीस पकडले, तर पाच हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. महाधोकादायक व्यक्तीच्या विघातक कृत्यांना आळा घालणार्यांना पाच हजार रुपयांचे, शस्त्र बाळगणार्या आरोपीला शस्त्र अधिनियम कलम 325 नुसार पकडल्यास दहा हजार रुपयांचे बक्षीस, शस्त्र अधिनियम कलम 425 नुसार कारवाई केल्यास तीन हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
आमच्या वेळी वीरप्पन, चार्ल्स शोभराजवर बक्षीस
चंदन तस्कर वीरप्पन,चार्ल्स शोभराज असे मोठे गुन्हेगार सापडत नव्हते तेव्हा अशाप्रकारचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता सरसकट गुन्हेगारांना पकडण्यासाठी बक्षिसे जाहीर केली, तर पोलिस यंत्रणेपुढेच प्रश्नचिन्ह निर्माण होतात. पोलिसांचे खबरी असतात, त्यांच्याकडून त्यांना माहिती मिळाली की त्यानुसार ती कारवाई करायची असते. याबाबत मी वरिष्ठ अधिकार्यांना विचारणार आहे. उगीच असे नवीन पायंडे कशासाठी पाडता, असेदेखील पवार म्हणाले.