पुणे : प्रदूषण करणार्‍या कंपनीवर कारवाई करा : दिलीप वळसे पाटील | पुढारी

पुणे : प्रदूषण करणार्‍या कंपनीवर कारवाई करा : दिलीप वळसे पाटील

शिरूर : पुढारी वृत्तसेवा :  रांजणगाव एमआयडीसीतील महाराष्ट्र इन्व्हायरो पॉवर लिमिटेड या कंपनीच्या (चएझङ) दूषित सांडपाण्याबाबत राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुणे येथे बुधवारी (दि. 1) महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या वेळी वळसे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी चर्चा करीत त्यांना विविध सूचना केल्या. दूषित पाण्यावर कंपनीने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, दूषित व केमिकलयुक्त पाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतमाल, पिकांचे पंचनामे करण्यास तातडीने सुरुवात करावी, नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश वळसे पाटील यांनी जिल्हाधिकारी देशमुख यांना या बैठकीत दिल्याची माहिती आंबेगाव-शिरूर विधानसभा संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंगभैया पाचुंदकर यांनी दिली.

याबाबत पाचुंदकर यांनी सांगितले की, कंपनीच्या प्रदूषण व दूषित पाण्याबाबत सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या कंपनीवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना वळसे पाटील संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. या कंपनीचे दूषित पाणी जात असलेल्या भागाची व परिसरातील गावात असलेल्या विहिरी व ओढे यांची जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकार्‍यांसमवेत तातडीने पाहणी करण्याच्या सूचना वळसे पाटील यांनी जिल्हाधिकारी देशमुख यांना  या वेळी दिल्या.

या बैठकीला जिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे,अतिरिक्त पोलिस अधिकारी मितेश घट्टे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे, मानसिंगभैया पाचुंदकर यांच्यासह निमगाव भोगीचे माजी सरपंच संजय पावसे, माजी सरपंच उत्तम व्यवहारे, माजी ग्रामपंचायत सदस्य रामदास रासकर, रवींद्र पावशे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button