पुणे : वासुंदेतील शेतकर्‍यांचे खडीक्रशरविरोधात उपोषण | पुढारी

पुणे : वासुंदेतील शेतकर्‍यांचे खडीक्रशरविरोधात उपोषण

उंडवडी : पुढारी वृत्तसेवा : वासुंदे गावातील शेतकर्‍यांनी धूळ, प्रदूषण, अवैध ब्लास्टिंग व अवैध खडीक्रशरसंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवारी (दि. 30) एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.  वासुंदे ग्रामपंचायत व प्रशासन यांच्या मनमानीमुळे शेतकरी व ग्रामस्थांना शेतीतील नुकसानीला व आरोग्याला बळी पडावे लागत आहे. याकडे क्रशरवर बोअर ब्लास्टिंग केल्यामुळे विहिरी, बोअरवेलमधील पाणीपातळी कमी होत आहे. याचा परिसरातील शेतकर्‍यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. तसेच, लोकांना श्वसन व फुप्फुसाच्या आजारांसह विविध आजार या धुळीने उद्भवत आहेत.

वासुंदे येथील 2011 मध्ये झालेल्या ग्रामसभेत कोणत्याही खडीक्रशरला ’ना हरकत’ दाखला देऊ नये, असा ठराव झाला होता, तरीदेखील तो ठराव मोडून ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट  कारभारामुळे आज खडीकशर सुरू आहे. शेतकरी व ग्रामस्थ यांना नुकसानीला बळी पडावे लागत आहे. वारंवार प्रशासनाकडे तक्रार करून देखील प्रशासन या गोरगरीब शेतकर्‍यांच्या तक्रारीची दखल घेत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी ग्रामपंचायत व प्रशासन यांच्या कारभाराला कंटाळून अखेर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.  ग्रामपंचायत व प्रशासन यांनी शेतकर्‍यांच्या नुकसानीची व आरोग्याची दखल घेतली नाही, तर पुढील उपोषण दौंड तहसीलदारांच्या कार्यालयाबाहेर करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी या वेळी दिला.

 

Back to top button