वीजबिल ऑनलाईन भरण्यात पिंपरी-चिंचवड आघाडीवर | पुढारी

वीजबिल ऑनलाईन भरण्यात पिंपरी-चिंचवड आघाडीवर

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या तिमाहीत लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 14 लाख 77 हजार 830 ग्राहकांनी 375 कोटी 65 लाखांच्या वीजबिलांचा ’ऑनलाइन’ भरणा केला आहे. पुणे परिमंडलामध्ये ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यात पिंपरी-चिंचवड शहर आघाडीवर आहे.

गेल्या तीन महिन्यांत पिंपरी-चिंचवड शहर अंतर्गत पिंपरी विभागातील 8 लाख 65 हजार 953 तर भोसरी विभागातील 6 लाख 11 हजार 877 ग्राहकांनी ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. पुणे परिमंडळाने वीजबिलांचा ’ऑनलाइन’ भरणा करण्यात राज्यातील आघाडी कायम ठेवली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल 55 लाख 94 हजार 467 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक, इतर लघुदाब वीजग्राहकांनी ऑनलाइन भरणा केला आहे. त्या माध्यमातून 1375 कोटी 18 लाख रुपयांचा ‘ऑनलाइन’ रक्कम जमा झाली आहे.

ऑनलाइन वीजबिल भरण्यासाठी विविध पर्याय
उच्चदाब वीजग्राहकांसाठी दरमहा वीजबिल आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच, ते अनिवार्य देखील आहे. तर लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचे वीजबिल 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास ते आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे भरण्याची सोय आहे.

त्यासाठी 10 हजारांपेक्षा अधिक रकमेच्या वीजबिलावर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे. तर त्यापेक्षा कमी रकमेच्या बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणची अधिकृत वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपची सोय उपलब्ध आहे. त्याद्वारे बिल भरणा, चालू व मागील वीजबिल पाहणे, पावती पाहणे, एकाच खात्यातून अनेक वीजजोडण्यांचे बिल भरणे यासह इतर सर्व ग्राहक सेवा उपलब्ध आहेत.

वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपद्वारे सोय
महावितरणकडून प्रामुख्याने बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहण्याऐवजी किंवा कार्यालयीन वेळेतच वीजबिल भरण्याऐवजी ‘ऑनलाइन’द्वारे घरबसल्या व 24 तास वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक व इतर लघुदाब ग्राहकांना ुुु.ारहरवळीलेा.ळप ही वेबसाईट व मोबाईल अ‍ॅप उपलब्ध आहे. त्यामुळे एकाच नोंदणीकृत खात्यातून स्वतःच्या एकापेक्षा अधिक कुठल्याही वीजजोडण्यांचे बिल ’ऑनलाइन’ भरणे तसेच सर्व वीजजोडण्यांच्या वर्षभरातील मासिक बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती संगणकात किंवा मोबाईलमध्ये जतन करण्याची सोय उपलब्ध आहे.

वीजबिलात सवलतीचा लाभ
लघुदाब वीजग्राहकांनी क्रेडिट/डेबीट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकींग, मोबाईल वॉलेटद्वारे ‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. तसेच क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यांयाद्वारे ’ऑनलाइन’द्वारे होणारा बिल भरणा आता नि:शुल्क आहे. विशेष म्हणजे ‘ऑनलाइन’ वीजबिल भरणा केल्यानंतर लगेचच संबंधीत ग्राहकांना मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पोच देण्यात येत आहे.

Back to top button