पुणे : कांदा दर्जा न गमावता साठवता येणार सहा ते सात महीने ; आयसीएआर व कांदा व लसूण संशोधन केंद्राचा अनोखा प्रयोग | पुढारी

पुणे : कांदा दर्जा न गमावता साठवता येणार सहा ते सात महीने ; आयसीएआर व कांदा व लसूण संशोधन केंद्राचा अनोखा प्रयोग

सुषमा नेहरकर-शिंदे :

पुणे : पारंपरिक कांदा साठवण चाळीऐवजी कमीत कमी नुकसान व जास्तीत जास्त साठवणक्षमता असलेले देशातील पहिले नियंत्रित ‘स्टोअरेज स्ट्रक्चर’ खेड तालुक्यात विकसित करण्यात आले आहे. आयसीएआर व कांदा व लसूण संशोधन केंद्राच्या वतीने तयार करण्यात आलेल्या या स्ट्रक्चरमध्ये तब्बल 2000 मेट्रिक टन कांदा एकाच वेळी किमान पाच ते सहा महिने उत्तम दर्जासह टिकून राहतो. कांद्याच्या हंगामी उत्पादनामुळे पुरवठा आणि मागणीतील तफावतीने किमतीतील चढ-उतार ही शेतकरी, ग्राहक आणि धोरणनिर्मात्यांसाठी मोठी चिंतेची बाब आहे. बाजारातील किमतींचा चढ-उतार रोखण्यासाठी या साठवणूक पध्दतीचा चांगला उपयोग होणार आहे.

याबाबत कांदा-लसूण संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. राजीव बळीराम काळे यांनी सांगितले की, आपल्याकडे 20 टक्के कांदा उत्पादन खरीप हंगामात, 20 टक्के खरीप हंगामात उशिरा आणि 60-65 टक्के कांदा उत्पादन रब्बी हंगामात घेतले जाते. यामध्ये मार्च ते जुलै यादरम्यान कांद्याचे दर प्रचंड कमी होतात आणि शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. मागणी वाढते तेव्हा कांदा उपलब्ध न झाल्याने दरामध्ये मोठी वाढ होते. पण, अशा वेळी शेतकर्‍यांकडे देखील कांदा शिल्लक नसतो. कारण, सर्वसामान्य शेतकर्‍यांकडे 5 ते जास्तीत जास्त 50 मेट्रिक टनापर्यंत पारंपरिक साठवण चाळीत कांदा साठवण्याची क्षमता असते.

या पारंपरिक कांदा चाळीत कांदा खराब होण्याचे प्रमाण 40 ते 60 टक्क्यांपर्यंत असते. तसेच, कोल्ड स्टोअरेजमधील कांदा बाहेर काढल्यानंतर आठ-पंधरा दिवसांत कोंब येण्यास व सडण्यास सुरुवात होते. साठवणुकीचे नुकसान कमी करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर कांदा साठवण्यासाठी आधुनिक साठवण तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेऊन आयसीएआर व कांदा व लसूण संशोधन केंद्राच्या वतीने काला बायोटेक प्रा. लि.च्या मदतीने तापमान, आर्द्रता आणि खेळती हवा, या सर्व गोष्टींचा विचार करून खास कांदा व त्यासोबतच इतर फळे-भाजीपाला किमान पाच-सहा महिने अत्यंत उत्तम पद्धतीने साठवणूक राहील असे देशातील पहिले नियंत्रित स्टोअरेज स्ट्रक्चर खेड तालुक्यात विकसित केले आहे.

या नियंत्रित स्टोअरेज स्ट्रक्चरमध्ये तब्बल 2000 मेट्रिक टन कांदा साठवणूक करू शकतो. हे नियंत्रित स्टोअरेज स्ट्रक्चर 1000 मेट्रिक टनापासून तब्बल 5000 मेट्रिक टनापर्यंत उभारू शकतो. सेन्सॉर बेस स्ट्रक्चरचे तापमान आपण मोबाईलवर घरबसल्या सेट करू शकतो. त्यामुळेच भविष्यात पारंपरिक कांदा चाळीऐवजी अत्याधुनिक व जास्तीत जास्त काळ साठवणक्षमता असलेले हे मॉडेल शेतकर्‍यांसाठी वरदान ठरू शकते.

आयसीएआर व डीओजीआरचे पेटंट
आयसीएआर व कांदा व लसूण संशोधन केंद्राने विकसित केलेल्या अनोख्या व अत्याधुनिक नियंत्रित स्टोअरेज स्ट्रक्चरचे पेटंट देखील घेतले आहे.

आयसीएआर व कांदा व लसूण संशोधन केंद्राने विकसित केलेल्या या स्ट्रक्चरचा कांद्याच्या किमती नियंत्रित राहण्यासाठी, जास्तीत जास्त कांदा एकाच वेळी जास्त कालावधीत साठवणूक करण्यासाठी अत्यंत उपयोग होणार आहे. सध्या स्ट्रक्चर उभारणीचा खर्च सर्वसामान्य शेतकर्‍यांसाठी अधिकचा असला, तरी सरकारी अनुदाआवर शेतकरी गट, शेतकरी कंपन्या, बाजार समित्या हे मल्टिमॉडेल स्ट्रक्चर उभारू शकते. बाजार समित्या शेतकर्‍यांना भाडेतत्त्वावर अशी स्टोअरेज उपलब्ध करून देऊ शकतात.
                                                                     -डॉ. राजीव बळीराम काळे

Back to top button