पिंपरी : बसची वाट पाहताय... सावधान! बस थांब्यावर सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट | पुढारी

पिंपरी : बसची वाट पाहताय... सावधान! बस थांब्यावर सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : तुम्ही जर बसची वाट पाहत असाल तर, जरा सावध राहा..! कारण तुमचे लक्ष बसकडे असल्याचे पाहून चोरटे तुमच्या गळ्यातील सोने सहज हिसकावून नेऊ शकतात. मागील चार दिवसांत बसथांब्यावर बसची वाट पाहत असलेल्या तीन प्रवासी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून नेल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागील काही महिन्यांपासून शहरात स्ट्रीट क्राईम वाढत असल्याचे बोलले जात आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील अपुरे मनुष्यबळ, हे यामागे असणारे महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे. पुरेसे मनुष्यबळ मिळावे, यासाठी उच्चपदस्थ अधिकार्‍यांचा शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे. यातच सध्या पोलिस आयुक्तालयातील पोलिस भरतीप्रक्रियेत अडकले आहेत. त्यामुळे चोरट्यांचे फावल्याचे दिसून येत आहे.

निगडी, देहूगाव येथे घडल्या घटना
फिर्यादी महिला 26 जानेवारी रोजी निगडी येथील बस स्थानकावर बसची वाट पाहत थांबली होती. महिला बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील दीड टोळ्यांचे 45 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. त्यानंतर 29 जानेवारी रोजी 61 वर्षीय वृद्ध महिला देहूगाव बस स्थानकावरून आळंदीकडे जात होती. वृद्ध महिला आणि आणखी एक सहकारी महिला बसमध्ये चढत असताना दोघींच्या गळ्यातील एक लाख 20 हजारांचे दोन मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले.

दागिन्यांचे प्रदर्शन टाळा
काही महिलांना अंगावरील सोन्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन करण्याची आवड असते. अनेकदा पोलिस प्रवासी महिलांना आपले दागिने पदराआड झाकून घेण्यास सांगतात. अशा वेळी महिला नाक तोंड मुरडून काही काळासाठी दागिने झाकून ठेवतात. मात्र, काही वेळानंतर लगेचच पुन्हा दागिने दिसतील अशा पद्धतीने घालतात. त्यामुळे महिलांच्या पाळतीवर असलेल्या चोरट्यांना आयती संधी मिळते. त्यामुळे दागिन्यांचे प्रदर्शन टाळा, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार केले जात आहे.

बस थांब्यावर हवेत पोलिस
बसमध्ये आणि बस थांब्यावर दागिने हिसकावण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी साध्या वेशात पोलिस तैनात करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. याकडे उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी लक्ष देण्यास

उकल होण्याचे प्रमाण अत्यल्प
चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघड होण्याचे प्रमाण इतर गुन्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. उकल होण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तोपर्यंत महिलांनी स्वतःच खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Back to top button