खून करून फरार झालेल्या आरोपीस अटक; पौड पोलिसांची कारवाई | पुढारी

खून करून फरार झालेल्या आरोपीस अटक; पौड पोलिसांची कारवाई

पौड; पुढारी वृत्तसेवा : नऊ महिन्यांपूर्वी जमिनीच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला पौड पोलिसांनी अटक केली. प्रतिक राजकुमार गुप्ता (वय 20, मूळ रा. बिहार) असे त्याचे नाव आहे. गुप्ता व त्याच्या चार साथीदारांनी वकील मिलिंद दत्तात्रय शिवणकर (वय 60, रा. कोथरूड, पुणे) यांचा खून मुख्य आरोपी विक्रांत सुभाष कांबळे (रा. कासारआंबोली, ता. मुळशी) यांच्या सांगण्यावरून केला होता. कासारआंबोली येथील जमिनीच्या व्यवहारामध्ये जाणीवपूर्वक कायदेशीर अडचणी निर्माण करीत असल्याचा राग मनात धरून शिवणकर यांचे मे 2022 मध्ये पिरंगुट येथील घाटातून अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांचा खून करून मृतदेह लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथील दरीत टाकून दिला.

खुनाच्या घटनेनंतर गुप्ता हा फरार झाला होता. आरोपी भूगावला येणार असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलिस निरीक्षक रमेश गायकवाड, पोलिस हवालदार रॉकी देवकाते यांना मिळाली. त्यानुसार पौड पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आरोपीस अटक केली. यातील इतर चार आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील, पौडचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रमेश गायकवाड, हवालदार रॉकी देवकाते, हवालदार आबा सोनवणे, शिपाई साहिल शेख, अक्षय यादव, आकाश पाटील, होमगार्ड अरुण जाधव यांनी केली.

Back to top button