खोर; पुढारी वृत्तसेवा : मुंबई ते सोलापूर वंदे भारत ट्रेनला दौंड स्थानकात थांबा द्यावा, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी पत्राद्वारे केली आहे. लवकरच महाराष्ट्राला दोन वंदे भारत गाड्या मिळणार आहेत. मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी या मार्गांवर त्या धावतील. यातील मुंबई ते सोलापूर वंदे भारत रेल्वेची नियमित सेवा सुरू झाल्यानंतर या गाडीला दौंड स्थानकात थांबा द्यावा, अशी मागणी कुल यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दौंड जंक्शन हे मुंबई-चेन्नई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख जंक्शन आहे.
पुण्याहून अहमदनगर, शिर्डी, मनमाड, भोपाळ आणि नवी दिल्लीकडे जाणार्या गाड्या या स्थानकांवरून जातात. अनेक प्रवासी गाड्यांसाठी हा एक प्रमुख थांबा आहे. दौंड हे प्रमुख मालवाहतूक केंद्रदेखील आहे. वंदे भारत ट्रेन दौंड तसेच बारामती, इंदापूर, श्रीगोंदा आणि कर्जत या तालुक्यांनादेखील सोयीची ठरेल. विशेषत: व्यापारी, सरकारी अधिकारी, कामगार व विद्यार्थ्यांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे. याबाबत राज्यमंत्री दानवे सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वास कुल यांनी व्यक्त केला.