भवानीनगर : काही मंडळी विकासकामांत बिब्बा घालण्याचे काम करतात : माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे | पुढारी

भवानीनगर : काही मंडळी विकासकामांत बिब्बा घालण्याचे काम करतात : माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

भवानीनगर(ता. इंदापूर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत, परंतु तालुक्यातील काही मंडळी विकासकामांमध्ये बिब्बा घालण्याचे काम करीत आहेत, असा आरोप आमदार दत्तात्रय भरणे यांनी केला. शिंदेवाडी (ता. इंदापूर) येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित केलेल्या सभेमध्ये भरणे बोलत होते. श्री छत्रपती कारखान्याचे संचालक गणेश झगडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, गणेश झगडे, सचिन सपकळ, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, सणसर सोसायटीचे अध्यक्ष परशुराम रायते, सणसरचे सरपंच पार्थ निंबाळकर, खरेदी-विक्री संघाचे संचालक अमोल भोईटे, कुरवलीचे सरपंच राहुल चव्हाण, हिंगणेवाडी सोसायटीचे अध्यक्ष सचिन डांगे, सोपान पवार, आप्पासाहेब पाटील, अभयसिंह निंबाळकर, सागर भोईटे, श्रीनिवास कदम, योगेश माने, सौरभ झगडे, तुषार सपकळ व ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.

या वेळी भरणे म्हणाले, आपण आमदार, मंत्री झाल्यापासून गटा-तटाचे राजकारण न करता तालुक्यातील मागासवर्गीय, अल्पसंख्याक, गोरगरीब ग्रामस्थांच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहोत. लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजना राबवण्यासाठी मागील काळात लोकांनी नुसत्या गप्पा मारल्या. विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच जयंत पाटील यांच्या माध्यमातून लाकडी-निंबोडी योजना 35 टक्के बारामतीसाठी व 65 टक्के इंदापूर तालुक्यासाठी मंजूर केली, परंतु काही विरोधकांनी ही योजना हाणून पाडण्याचा प्रयत्न केला.

ही योजना मंजूर झाल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील लोकांना आपल्याविरोधात खोटंनाटं सांगून योजना बंद पाडण्याचे षडयंत्र केलं होतं, परंतु ही योजना केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे भरणे म्हणाले. या वेळी शिदेंवाडी येथील दोन मंदिराच्या सभामंडपासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून 15 लाख रुपये व भरणे यांच्या माध्यमातून 25 लाख रुपये असा 40 लाख रुपयांचा निधी देण्याचे भरणे यांनी जाहीर केले.

अधिकार्‍यांवर अजित पवार यांचा वचक
प्रशासनातील अधिकारी मुख्यमंत्र्यांपेक्षा अजित पवार यांना घाबरतात. त्यामुळे निधी खेचून आणताना व विकासकामे करताना दादांचा फार मोठा फायदा होतो. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांचादेखील तेवढाच फायदा होतो, असे देखील भरणे यांनी या वेळी सांगितले.

Back to top button