पुणे : भिगवणमध्ये भरदिवसा युवकावर टोळक्याचा हल्ला ; वर्दळीच्या चौकात नंगानाच | पुढारी

पुणे : भिगवणमध्ये भरदिवसा युवकावर टोळक्याचा हल्ला ; वर्दळीच्या चौकात नंगानाच

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : भिगवणच्या भर वर्दळीच्या ठिकाणी युवकांचा नंगानाच दहशत व दादागिरीला खतपाणी घालणारा ठरला. एका युवकाला दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने श्रीनाथ चौकात बेदम मारहाण केली. भर दिवसा व भर रस्त्यात आणि तेवढ्याच वर्दळीच्या ठिकाणी अर्धा तास हा खुलेआम धिंगाणा सुरु होता. या भांडणाचे नक्की कारण पुढे आले नसले तरी एकमेकांना खुन्नस देण्याच्या किरकोळ करणातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.

याचे झाले असे की, भैरवनाथ व कला महाविद्यालयाजवळ असलेल्या राणी जनरल चौकात सोमवारी (दि. ३०) सकाळी पावणे दहाच्या सुमारास एका दुचाकीवरुन युवकाला दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने घेरले व फिल्मी स्टाईल धुलाई सुरू केली. लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी ही मारहाण सुरू होती. मारहाण होत असलेला युवक सैरभैर होऊन ग्रामपंचायत कार्यालय, तेथून सेवा रस्त्याने बाजार समितीच्या आवारात घुसला; तरी देखील हे १० ते १२ जणांचे टोळके त्याचा पाठलाग करून त्याला मारहाण करीत होते.

भर वर्दळीच्या ठिकाणी या फ्री स्टाईल हाणामारीच्या अनपेक्षित प्रकाराने सामान्य नागरिक मात्र गोंधळून भयभीत झाले होते. पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत सर्व युवक पसार झाले होते. विशेष म्हणजे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेण्याऐवजी सहज घेतल्याचे जाणवत होते. याबाबत पोलिस ठाण्यात संपर्क साधला असता जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले तसेच याची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी भांडणाचे मूळ गुलदस्त्यात राहिले आहे.

Back to top button