भोर खरेदी-विक्री संघ ऊर्जितावस्थेत आणणार : आमदार संग्राम थोपटे | पुढारी

भोर खरेदी-विक्री संघ ऊर्जितावस्थेत आणणार : आमदार संग्राम थोपटे

भोर; पुढारी वृत्तसेवा : भोर खरेदी – विक्री संघ मरगळीचा संघ म्हणून ओळखला जात होता. मात्र, खते – बी – बियाणे यांची विक्री वाढल्यावर संघाने शॉपिंग सेंटरची उभारणी केली, तसेच संघाला दूध संस्थेचा वाहतूक खर्च मिळत गेल्यावर संघाच्या उत्पादनात वाढ झाली. संघ हा शेतकर्‍यांमधील दुवा असल्याने ही संस्था भरभराटीस आणण्यासाठी संचालक मंडळ काम करेल, असा विश्वास आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला.

भोर तालुका शेतकरी खरेदी – विक्री संघाच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा तसेच शिक्षण शुल्क समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल राजगड ज्ञानपीठच्या मानद सचिव स्वरूपा थोपटे यांचा शुक्रवारी (दि. 27) आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

या वेळी राजगड साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पोपट सुके, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाजी शिनगारे, माजी सभापती बाळासाहेब थोपटे, मुंबई बाजार समिती संचालक धनंजय वाडकर, उत्तम थोपटे, विकास कोंडे, शिवाजी कोंडे, उपसभापती रोहन बाठे, हनुमंत शिरवले, विठ्ठल आवाळे, अनिल सावले आदींसह खरेदी – विक्री संघाचे अध्यक्ष अतुल किंद्रे, उपाध्यक्ष अतुल शेडगे, संचालक, शेतकरी उपस्थित होते.

आ. थोपटे म्हणाले, खरेदी – विक्री संघाची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे. यापुढे मासिक सभेत संचालकांनी हजेरी लावावी. शेतकर्‍यासाठी संघ कसा फायदेशीर करता येईल यासाठी लक्ष घालणार आहे. या वेळी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते तालुक्यातील 13 प्रगतशील शेतकर्‍यांचा सन्मान करण्यात आला.

भोर तालुका हा भात उत्पादनात अग्रेसर असल्यामुळे खरेदी – विक्री संघाच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी तांदूळ महोत्सवाचे आयोजन करून शेतीमालाला योग्य भाव देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे अतुल किंद्रे यांनी सांगितले. भोर नगरपरिषदेच्या शॉपिंग सेंटरमध्ये संघासाठी गाळा देण्यात यावा. यामुळे संघाचे उत्पन्न वाढेल, असे सोमनाथ सोमाणी यांनी सांगितले. सूत्रसंचालन राजेंद्र शेटे यांनी केले.

मी माझ्या पक्षातच : आ. थोपटे
वृत्तवाहिन्यांवर आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे 15 आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु, माझ्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या निरीक्षकपदाची जबाबदारी दिली आहे. मी काँग्रेसबरोबर आहे. वाहिन्यांवरील चर्चा निरर्थक आहे.

Back to top button